पुणे : डोळे दिपवणाऱ्या लेझर प्रकाशझोतांवर विसर्जन मिरवणुकीत बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतेच मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले. पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पुढील साठ दिवस शहर परिसरात लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले.
लोहगाव परिसरात हवाई दलाचा तळ आहे, तसेच नागरी विमानतळ आहे. लेझर दिव्यांमुळे वैमानिकांचे डोळे दिपून अपघात होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून नियमित आदेश काढण्यात येत असतात. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी शनिवारपासून (२४ ऑगस्ट) पुढील साठ दिवस लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले. संबंधित आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश शर्मा यांनी दिले आहेत.
हेही वाचा : या आठवड्यात मटार उसळ करण्याचा प्लॅन असेल, तर ही बातमी आधी वाचा…
गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत लेझर दिव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. लेझर दिव्यांमुळे डोळ्यांना इजा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार विसर्जन मिरवणूकीत लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले होते. दहीहंडी मंगळवारी (२७ ऑगस्ट) आहे. दहीहंडीत विविध मंडळांकडून लेझर दिव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. यापार्श्वभूमीवर सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी लेझर दिव्यांवर बंदी घालण्याचे आदेश शनिवारी रात्री दिले. पुढील साठ दिवस शहरात लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी राहणार आहे. त्यानंतर पोलिसांकडून सुधारित आदेश काढण्यात येणार आहेत.