टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तब्बल ७ हजार ९०० जणांनी लाखो रुपये देऊन पात्र झाल्याचे प्रमाणपत्र मिळविले आहे. या उमेदवारांनी ओएमआर शीटमध्ये मार्क वाढविले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अमिताभ गुप्ता म्हणाले, “टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. काही दिवसापूर्वी ७ हजार ९०० अपात्र उमेदवारांनी पैसे देऊन पात्रता मिळविल्याचे दिसून आले होते. त्यानुसार आमचा तपास सुरू होता. असं असताना काही उमेदवारांच्या ‘कास्ट कॅटेगरी’ बदलण्यात आल्याचं समोर आलं.”
“या उमेदवारांना पात्र करण्यासाठी प्रश्नपत्रिका सोडविताना काही कोडवर्ड देण्यात आले होते. तसेच ओएमआर शीटमध्ये मार्क वाढविले गेले आहे. यामुळे या प्रकरणी लाखो रुपये देऊन हे सर्व उमेदवार पास झाल्याचं निष्पणन्न झालंय. या प्रकरणाचा अहवाल लवकरच राज्य सरकारला दिला जाणार आहे,” अशी माहिती अमिताभ गुप्त यांनी दिली.