पुणे : ‘रस्यावर चालणारा प्रत्येक जण गु्न्हेगार नाही. वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करावी. मात्र, कारवाई करताना वादाचे प्रसंग टाळावेत. नागरिकांशी सौजन्याने वाागावे’, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी दिले. मुंबईच्या धर्तीवर पुणे पोलीस दलात वाहतूक शाखेत काम करणाऱ्या पोलिसांसाठी प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव उपस्थित होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘पुणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यसाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. महापालिका, तसेच विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून वाहतूक विषय सुधारणा करण्यात येत आहेत. पुणे शहरात विविध वाहतूक विषयक कामे, तसेच पायाभूत सुविधांसाठी पोलिसांना एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला.नवीन भरती प्रक्रियेतील .८०० पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले. अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी ४३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन देण्यात आला आहे. नवीन सात पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले. वाहतूक शाखा म्हणजे पुणे पोलिसांचा जनसंपर्क कक्ष आहे. रस्त्यावरून जाणारा वाहनचालक किंवा नागरिक गुन्हेगार नाही. याची जाणीव पोलिसांनी ठेवावी. कारवाई करताना वादाचे प्रसंग टाळावेत. नागरिकांशी सौजन्याने वागावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.’

मुंबई पोलीस दलात वाहतूक शाखेत नियुक्ती हाेण्यापूर्वी पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते. पुण्यातही वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देण्यसाठी पोलीस दलाअंतर्गत संस्था सुरू करण्यात येणार आहे. प्रशिक्षण संस्थेसाठी जागेचा शोध सुरू आहे. मात्र, पोलिसांना आतापासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली असून, पहिल्या तुकडीतील ५० पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले.

गुन्हा केला तर खैर नाही

वाहनांची तोडफोड, दहशत माजविणाऱ्या गुंडांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. ‘मकोका’, ‘एमपीडीए’कायद्यान्वये सराइतांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही सराइतांमध्ये सुधारणा होत नसेल तर पुढच्या सात पिढ्या विसरणार नाही, अशी कठोर कारवाई करु, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

‘आका’वरही कारवाई

पोलिसांवर दबाब आणण्याचा प्रयत्न, तसेच गुन्हेगारांना पाठबळ देेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. गुन्हेगारांच्या पाठीशा असणाऱ्या ‘आकां’वरही कारवाई करू, असे त्यांनी स्पष्ट केले. समाज माध्यमात दहशत माजविणाऱ्या चित्रफिती प्रसारित केल्याप्रकरणी गेल्या वर्षी २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली. गुन्हेगारीचे उद्दात्तीकरण केल्यास कठोर कारवाई करू, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त काय म्हणाले ?

  • गंभीर गुन्हा घडल्यानंतर आठ मिनिटात पोलीस घटनास्थळी (रिस्पाॅन्स टाइम)
  • रिस्पाॅन्स टाइम पाच मिनिटावर आणण्याचा प्रयत्न
  • तक्रार आल्यास गुंडांविरुद्ध कठोर कारवाई
  • अवैध धंद्यांवर कठोर कारवाई
  • खून, खुनाच्या प्रयत्नात घट
  • जमिनीवरचे ताबे, आर्थिक फसवणूक प्रकरणात सामन्यांना न्याय देण्याचा प्रयत्न
  • कोयता गँगवर अस्तित्वात नाही

Story img Loader