पुणे : पोलीस दलातील बेशिस्तीला चाप लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पावले उचलली आहेत. वाघोली पोलीस चौकीसमोर एका तरुणाने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, तसेच मगरपट्टा पोलीस चौकीत चौकशीसाठी बोलावलेल्या महिलेशी गैरवर्तन केल्याच्या घटना घडल्या. या घटनांची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके आणि हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी बदली करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले.
अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर शहरातील गुंडांची झाडाझडती घेतली. पोलीस दलातील बेशिस्तांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनी सूचना दिल्या. ललित कला केंद्रात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर या घटनेची माहिती त्वरीत वरिष्ठांना न दिल्याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश दिले. गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. मगरपट्टा पोलीस चौकीत चैाकशीसाठी ताब्यात घेतलेल्या महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह दोन महिला कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.
हेही वाचा…नदीपात्रात डासांसारख्या कीटकांचे थवे, महापालिका करणार शहरात ड्रोनद्वारे औषध फवारणी
वाघोली पोलीस चौकीसमोर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली. मगरपट्टा चौकीतील पोलिसांच्या गैरवर्तन प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली.