पुण्यातील कल्याणीनगर भागातील पबमधून शनिवारी मध्यरात्री पार्टी करुन अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे जण दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी भरधाव आलिशान पोर्शे कारने दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीवरुन जाणार्‍या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी अल्पवयीन कार चालक आरोपी मुलाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर आरोपीला कोर्टात हजर केल्यावर, १५ दिवस येरवडा पोलिसांसोबत वाहतूक नियमनाचे काम करावे लागणार आणि अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहावा. या अटीच्या आधारावर जामीन देण्यात आला. या घटनेला काही तास होत नाही तोवर आरोपीला जामीन मिळाल्याने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील महायुतीचे भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ, शिवसेनेचे नेते अजय भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, रिपाई नेते सिद्धार्थ धेंडे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन देऊन, संबधित आरोपीवर कारवाई करावी. शहरातील पब चालकावर कडक निर्बंध घालण्यात यावे अशी मागणी या शिष्टमंडळामार्फत करण्यात आली.

हेही वाचा : Maharashtra Board 12th Results 2024 Date: बारावीच्या निकालाची तारीख राज्य मंडळाकडून जाहीर

यावेळी अमितेशकुमार म्हणाले की, कल्याणीनगर भागात काल घडलेली घटना अंत्यत दुर्देवी आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी दारू पिऊन कार चालवित होता. ही बाब स्पष्ट झाली असून या प्रकरणी आम्ही पब मालक, आरोपीचे वडील आणि विना नंबर प्लेट गाडी देणार्‍या शो रूमच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी हा कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला न्यायालयाने काही अटींच्या आधारे जामीन दिला आहे. पण हा मुलगा खरच अल्पवयीन आहे का ? याबाबतचा तपास आमची टीम शाळेत जाऊन करत आहे. तसेच दिल्ली येथील निर्भया प्रकरणी आरोपींना जामीन दिला नव्हता त्यानुसार आम्ही या आरोपीला जामीन देता कामा नये अशी मागणी देखील केली होती. मात्र आमची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याचे न्यायालयाचे आदेश, जामीन मंजूर

तसेच ते पुढे म्हणाले की, आम्ही आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी चर्चा होत आहे. पण आम्ही सर्व प्रकाराची कलम लावली आहेत. तरी देखील कोणी चर्चा करीत असेल तर समोरासमोर चर्चा करण्यास तयार आहोत, तसेच या प्रकरणी आम्ही कोणालाही सोडणार नाही. कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. आम्ही आरोपी विरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. कल्याणीनगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यासाठी एक्साईज विभागासोबत चर्चा करून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police commissioner amitesh kumar on kalyaninagar porsche car accident two deaths svk 88 css
Show comments