पुणे : ‘कल्याणीनगर अपघात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांंची चौकशी झाली होती का,’ या प्रश्नाला पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी होकारार्थी उत्तर दिले.
कल्याणीनगर येथे १९ मे रोजी झालेल्या अपघातात संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आमदार टिंगरे यांची चौकशी करण्यात आली होती का, असा प्रश्न शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारला असता, पोलीस आयुक्तांनी, ‘हो,’ असे उत्तर दिले.
‘या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी योग्य पद्धतीने केला. पोलिसांची कार्यपद्धती, तसेच तपासाबाबत शंका उपस्थित केली गेली होती. समाजमाध्यमात पोलिसांवर टीकाही करण्यात आली. मात्र, पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केला नाही. या प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली,’ असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : गणेशोत्सवाच्या तोंडावर दीड हजार लिटर गावठी दारू पकडली
अपघात प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपास केला. तांत्रिक तपासावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. परिस्थितीजन्य, तसेच तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले. साडेतीन महिन्यांपर्यंत या प्रकरणातील आरोपींना जामीन झाला नाही. यावरून तपास योग्यरीत्या केल्याचे सिद्ध झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.