पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बलात्कार, विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील सराइतांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले.

स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार करून पसार झालेला आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, रा. गुनाट, ता. शिरुर, जि. पुणे) याला पोलिसांनी मध्यरात्री गुनाट गावातून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांना अटकेबाबतची अधिकृत माहिती दिली. गाडे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. गुन्हा घडल्यानंतर काही तासात आराेपी गाडेने तरुणीवर बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले. फिर्याद दाखल होण्याचे काम सुरू असतानाच आरोपीचे नाव निष्पन्न झाले होते. गाडेला जानेवारी २०२४ मध्ये स्वारगेट परिसरात एका प्रवाशाच्या मोबाइल चोरी प्रकरणी अटक झाली होती. २०१९ मध्ये गाडेविरुद्ध पुणे ग्रामीण, तसेच अहिल्यानगर ग्रामीण पोलिसांकडून लुटणारीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नियमित तपासणी करण्यात यावी. बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल असलेल्या सराइतांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चाैकशी करण्यात यावे, असे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यमात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले.