शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश नवनियुक्त पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिल्यानंतर अवैध धंदे करणारे भूमिगत झाले आहेत. एवढेच नव्हे, तर या आदेशामुळे पोलीस दलातील अनेक अधिकारीही नाराज झाले आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशामुळे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई झाली. त्यामुळे उघडपणे चालणारे अवैध धंदे आता काही ठिकाणी छुप्या पद्धतीने सुरू झाले आहेत.
रश्मी शुक्ला यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे ३१ मार्च रोजी स्वीकारली. त्यानंतर दीर्घकालीन रजेवर गेलेले सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद रुजू झाले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांसह पोलीस उपायुक्त आणि सहायक आयुक्तांबरोबर झालेल्या पहिल्याच गुन्हेविषयक आढावा बैठकीत पोलीस आयुक्तांनी तातडीने अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत अशा पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सहपोलीस आयुक्त रामानंद यांनी काही दिवसांपूर्वी स्वत: चा मोबाईल क्रमांक शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील सूचना फलकांवर लावण्याचे आदेश देऊन अवैध धंद्यांची माहिती कळविण्याचे आवाहन नागरिकांना केले होते.
पोलीस आयुक्त शुक्ला आणि सहआयुक्त रामानंद यांनी, गैरप्रकार आणि अवैध धंदे खपवून घेण्यात येणार नाहीत, असा इशारा दिल्याने पोलीस दलातील अनेक अधिकारीही अडचणीत आले आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतरही कोरेगाव पार्कमधील उच्चभ्रू सोसायटय़ांमध्ये वेश्याव्यवसाय उघड झाला. विशेष शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकून पाच दलालांना अटक करुन त्यांच्या तावडीतून एका अल्पवयीन मुलीसह सहा तरुणींची सुटका केली होती. त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकावर कारवाई होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. लवकरच संबंधित अधिकाऱ्याची बदली पोलीस नियंत्रण कक्षात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहरात अनेक ठिकाणी मटका, पत्त्यांच्या नावाखाली जुगाराचे अड्डे चालू आहेत. सध्या शहरातील अवैध धंदे आणि त्यांचे चालक भूमिगत झाले आहेत. काही ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू आहेत. लॉटरीच्या नावाखाली मटका खेळला जात आहे. शहराच्या मध्यवस्तीतील अनेक लॉटरी व्यावसायिक अशा पद्धतीचा व्यवसाय करत आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर अवैध धंदे काहीसे थंडावले असले तरी अशा व्यावसायिकांनी छुप्या पद्धतीने त्यांचे व्यवसाय सुरू केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा