पुणे : पोलीस ठाण्यातील काम संपवून घरी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने सेनापती बापट रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या मद्यपी टोळक्याला हटकले. मद्यपी टोळक्याने थेट पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करुन त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनंतर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर ही बाब गेल्याने त्यांनी तत्काळ याप्रकरणात गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्याचे आदेश दिली. त्यानंतर कारवाई करुन तिघांना अटक करण्यात आली असून, साथीदाराविरुद्ध गनु्ह दाखल करण्यात आला.
याप्रकरणी रुपेश मांजरेकर, अनिकेत घोडके, अभिजित डोंगरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक चंद्रकांत जाधव (वय ४२, रा. रामोशीवाडी, रत्ना हाॅस्पिटलमागे, सेनापती बापट रस्ता) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव हे सहकारनगर पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. ते गुरुवारी रात्री कामावरुन घरी निघाले होते. सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हाॅस्पिटलजवळ रिक्षात आरोपी मांजरेकर, घोडके, डोंगरे आणि साथीदार दारु पित होते. ते रस्त्यात गोंधळ घालत होते. दुचाकीस्वार जाधव यांनी आरोपींना हटकले. त्यांनी जाधव यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘आम्हाला माहिती आहे. तू पोलीस आहेस. जास्त शहाणपणा करु नको’, असे आरोपींनी जाधव यांना सांगितले.
त्यानंतर आरोपींनी जाधव यांना धक्काबुक्की केली. रस्त्यात पडलेला दगड उचलून त्यांना मारला. जाधव यांनी आरोपींचे छायाचित्र मोबाइल कॅमेऱ्याद्वारे काढले. तेव्हा आरोपींनी त्यांचा मोबाइल संच हिसकावला. जाधव यांनी टोळक्याच्या तावाडीतून सुटका करुन घेतली. त्यानंतर त्यांनी चतु:शृंगी पोलीस ठाणे गाठले. रात्रपाळीतील अधिकाऱ्याने त्यांना उद्या तक्रार दाखल करा,असे सांगितले. जाधव यांनी वैद्यकीय तपासणीसाठी ससूनमध्ये पाठवा, असे सांगितले. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.
दुसऱ्या दिवशी जाधव पुन्हा पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. पोलिसांकडून तरंग या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रार नंतर दाखल करा, असे त्यांना सांगण्यात आले. जाधव यांनी तक्रार दाखल करु नये, म्हणून या भागातील एका राजकीय नेत्यांशी ओळख असलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर दबाब टाकला. अखेर जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या घटनेची तक्रार दिली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर पोलीस कर्मचाऱ्याला मारहाणीबाबतचा प्रकार गेला होता. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने अखेर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.