पुणे : हडपसर भागात झालेल्या तरुणाचा खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. नशा करत असल्याची माहिती आई आणि पत्नीला दिल्याने आरोपींनी तरुणाचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले. याप्रकरणी वैभव गणेश लबडे (वय ३१, रा. हिंगणे आळी, हडपसर), ज्ञानेश्वर दत्तू सकट (वय २७, रा. रामोशी आळी, हडपसर) यांना अटक करण्यात आली. अमोल उर्फ भावड्या मारुती माने (वय ३९, रा. रामोशी आळी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे.

हेही वाचा >>> मावळ: भाजपचा दुहेरी डाव; राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विरोधात प्रचार? सुनील शेळके नेमकं काय म्हणाले?

गुरुवारी (१९ सप्टेंबर) माने रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता. माने केटरिंग व्यावयायिकाकडे काम करत होता. तो एकटाच राहत होता. त्याच्या खुनामागचे कारण पोलिसांना समजले नव्हते. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. तांत्रिक तपासात माने याचा खून लबडे आणि त्याचा साथीदार सकट यांनी केल्याची माहिती तपासात मिळाली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत पत्नी आणि आईला नशा करत असल्याची माहिती दिल्याने आरोपी लबडे आणि साथीदार सकट यांनी लबडे याचा खून केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. पोलीस उपायुक्त आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश जगदाळे, सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, समीर पांडुळे यांनी ही कामगिरी केली.