व्हॉटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेणार
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये व्हॉटसअॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. ४४ व्हॉटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून शहरातील १३५६ ज्येष्ठ नागरिक पोलिसांशी जोडले गेले आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ३९ पोलीस ठाणी आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्यात याव्यात, असे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत. पोलीस ठाण्यांच्या पातळीवर ज्येष्ठांना ओळखपत्र देण्यात येणार असून त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली. ते म्हणाले की, शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस शिपायांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिक व्हॉटसअॅपचा वापर करतात. त्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोलीस ठाण्यांच्या पातळीवर व्हॉटसअॅप ग्रुप तयार क रण्यात आले आहेत.
आतापर्यंत ४४ व्हॉटसअॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्या माध्यमातून शहरातील १३५६ ज्येष्ठ नागरिक पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत जोडले गेले आहेत.
पुणे पोलीस आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष अद्यायावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ज्येष्ठांनी नजीकच्या पोलीस ठाण्यांमध्ये नावनोंदणी करावी. तसेच त्यांच्या तक्रारी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईन (दूरध्वनी- ०२०- २६११११०३ किंवा १००)येथे कराव्यात. पोलिसांनी फेसबुक, ट्विटर अशा समाजमाध्यमांचा वापर करण्यास केली आहे.
फेसबुक किंवा ट्विटरवर केल्या जाणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त पाटील यांनी सांगितले.
पोलिसांच्या ज्येष्ठांना सूचना
* घराच्या दरवाज्याला लोखंडी ग्रिल बसवावे
* अनोळखी व्यक्तीला घरात प्रवेश देऊ नये
* घरकामास ठेवलेल्या नोकरांची चारित्र्य पडताळणी करा
* नोकरांची इत्थंभूत माहिती ठेवा
* नजीकच्या पोलीस ठाण्याचा क्रमांक लक्षात ठेवा
* घराबाहेर पडताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी
* घराबाहेर पडताना ओळखपत्र बाळगावे
एक हजार तक्रारींचे निराकरण
पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्पलाईनवर गेल्या सहा महिन्यांत १०८४ तक्रारी करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे निराकरण पोलिसांनी केले आहे. ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंदणी सुरू केली आहे. त्यासाठी सदस्य नोंदणी फॉर्म भरून देणे आवश्यक आहे
पी.आर. पाटील ( पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा)