लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहराच्या हद्दीमध्ये झालेली वाढ, नव्याने सुरू करण्यात आलेली सात पोलीस ठाणी ध्यानात घेऊन प्रभावी कामकाजासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे मनुष्यबळ वाढविण्यात येणार असून सध्या कार्यरत ३६४ कर्मचाऱ्यांमध्ये आणखी २०० कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे गुन्हे शाखेचे कामकाज सशक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पुणे पोलिसांची गुन्हे शाखा ही महत्त्वाची शाखा असून गुन्हेगारांवर लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाईत त्यांचा महत्वाचा वाटा आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे शाखेचा महत्वपुर्ण सहभाग असतो. सद्यस्थितीत शहरात ३९ पोलीस ठाणी आहेत. तर, गुन्हे शाखेचे प्रमुख सहा युनिट आणि खंडणी विरोधी पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक यांची प्रत्येक दोन अशी सहा मिळून एकूण १२ पथके आहेत. शहरातील गुन्ह्यांचा समांतर तपास केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून शहराची हद्द  वाढली आहे. नव्याने सात पोलीस ठाणे कार्यान्वित झाले आहेत. वाढलेल्या पोलीस ठाण्यांमुळे कार्यकक्षेत वाढ झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करता ही पुनर्रचना करण्यात येणार आहे.

बंदोबस्त नसलेली तीन पथके

शहरात सोनसाखळी चोरी, वाहनचोरी, घरफोड्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यासाठी गुन्हे शाखेने तीन स्वतंत्र पथक तयार केले असून या पथकांच्या माध्यमातून अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. एक अधिकारी आणि आठ ते दहा कर्मचाऱ्यांचा या पथकांत समावेश असेल. ही पथके संपूर्ण शहरभर गस्त घालतील. प्रभावीपणे काम करता यावे, यासाठी या पथकांना बंदोबस्ताचे काम देण्यात येणार नाही.  

गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वाढलेला विस्तार, नव्याने तयार झालेली पोलीस ठाणी यांचा विचार करून ही पुनर्रचना केली जाईल. तर, अतिरीक्त मनुष्यबळासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. -शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा

Story img Loader