पुणे पोलिसांनी सायबर गुन्हे तपास आणि प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेने गौरव केला आहे. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्ले यांच्या हस्ते सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या यशाबद्दल पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी सायबर सेलमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
पुणे पोलिसांनी गेल्या दोन-तीन वर्षांत नॅसकॉम आणि डीएससीआय लॅबचे नूतनीकरण करून अत्याधुनिक फॉरेन्सिक आणि प्रशिक्षण प्रयोगशाळा तयार केली आहे. यामध्ये आतापर्यंत ४ हजार १८७ पोलिसांचे प्रशिक्षण झाले आहे. सायबर गुन्हे तपासासाठी मार्गदर्शक कार्यप्रणाली तयार केली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर गुन्हे तपासासाठी सायबर स्कॉडची निर्मिती केली आहे. पुणे पोलीस विद्यार्थी अभियानांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून त्यांच्याद्वारे गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न केले. या विविध उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.