पिंपरी : पोलिसांनी मागील काही महिन्यांत केलेल्या ५२ कारवायांमधील ६८३.८३० किलो गांजा नष्ट केला. मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शासकीय विभागात सात कलमी कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये शासकीय सेवा नागरिक केंद्रित करण्यावर आणि शासकीय कार्यालयातील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे, स्वच्छता आदींचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मागील काही महिन्यांमध्ये गांजा विक्री, बाळगल्या प्रकरणी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. त्या कारवायांमध्ये जप्त केलेला गांजा साठवून ठेवण्यात आला होता.

अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) विवेक पाटील, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या प्रतिनिधी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार केले आहे. या पथकाने ५२ गुन्ह्यात जप्त केलेला ६८३.८३० किलो गांजा नष्ट करण्याबाबत कायदेशीर बाबी पूर्ण केल्या. रांजणगाव एमआयडीसी मधील महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड या कंपनीत फॉरेन्सिक लॅब पुणे, राज्य उत्पादन शुल्क पुणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत गांजा नष्ट केला.

ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सचिन कदम, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र बांबळे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर परदेशी, मयूर वाडकर, शिल्पा कांबळे, निखिल शेटे, संतोष स्वामी, सदानंद रुद्राक्षे, रणधीर माने, कपिलेश इगवे यांनी केली.

Story img Loader