पुणे : सायलेन्सरमध्ये फेरफार करून फटाक्यासारखे आवाज काढणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत शहरातील वेगवेगळ्या भागांत कारवाई करून ५७१ बुलेटस्वारांविरुद्ध कारवाई केली असून, सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या सायलेन्सरवर बुलडोझर चालवून ते नष्ट करण्यात आले.
सायलेन्सरमध्ये फेरफार केल्यानंतर (मॉडिफाय) फटाक्यासारखा आवाज येतो. रात्री-अपरात्री फटाक्यासारखे आवाज काढून फिरणाऱ्या बुलेटचालकांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी बुलेटचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. दोन दिवसांत ५७१ बुलेटस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेले सायलेन्सर नष्ट करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.
हेही वाचा…पिंपरी : हिंजवडीत बनावट पासपोर्ट बनवणारी टोळी अटकेत
सायलेन्सरमध्ये फेरफार केल्यानंतर फटाक्यासारखा आवाज निर्माण होतो. शाळा, महाविद्यालये, रुग्णालयाच्या परिसरात बुलेटचालक फटाक्यासारखे आवाज काढून फिरायचे. त्याचा त्रास सामान्यांना सहन करावा लागत होता. शहरातील सर्व भागांत बुलेटचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. हडपसर, कोरेगाव पार्क, विमानतळ, हांडेवाडी, डेक्कन, भारती विद्यापीठ भागात हे प्रकार सर्वाधिक असल्याचे कारवाईत दिसून आले. कारवाई केलेल्या बुलेटचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. सायलेन्सरचा पुनर्वापर होऊ नये म्हणून ते नष्ट करण्यात आले. येरवड्यातील वाहतूक शाखेच्या मोकळ्या जागेत सायलेन्सरवर बुलडोझर चालवून नष्ट करण्यात आले, असे बोराटे यांनी सांगितले.
सायलेन्सरमध्ये फेरफार करणे, तसेच वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी टसॲप क्रमांक (८०८७२४०४००) उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.