पुणे : पुणे रेल्वे स्थानक, शिवाजीनगर स्थानकात बाॅम्बस्फोट घडविण्याची धमकी देणाऱ्या एकाला हडपसर परिसरातील मांजरी भागातून ताब्यात घेण्यात आले. आरोपीने दारूच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून खोटी माहिती दिल्याचे तपासात निषन्न झाले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील महत्वाच्या स्थानकांमध्ये बाॅम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याची एकाने दूरध्वनीद्वारे पोलिसांना दिली होती.
हेही वाचा : वांद्रे आणि गेट वे जवळ स्फोट होणार; पुण्यातील नियंत्रण कक्षाला दूरध्वनी
पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासात पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करणारा आरोपी हडपसरमधील मांजरी भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. दारुच्या नशेत त्याने नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे तपासात उघडकीस आले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यत येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.