बांधकाम पाडण्याची धमकी देऊन बांधकाम व्यावसायिकाकडून तीन लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी कथित माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर आल्हाटसह त्याच्या साथीदारांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद मोहन मोरे (वय ३३, रा. हडपसर) यांनी याबाबत कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी कोथरुड पोलिसांकडून सुधीर आल्हाट (रा. शिवाजीनगर), अर्चना दिनेश समुद्र, रोहन दिनेश समुद्र, दिनेश विद्याधर समुद्र (सर्व रा. कोथरुड) तसेच रवी वणगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी आल्हाट आणि साथीदारां विरोधात खंडणी उकळल्या प्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
कोथरुडमधील महात्मा सोसायटीतील जागा मोरे यांनी विकसनासाठी घेतली होती. समुद्र कुटुंबीयांना विकसनात सहभागी करून घेण्यात आले होते. तेथे होणाऱ्या बांधकामासाठी अर्चना समुद्र, रोहन आणि दिनेश समुद्र यांनी सदनिकाधारकांकडून १४ लाख रुपये घेतले होते. समुद्र कुटुंबीयांनी आल्हाटशी संगनमत करुन कागदपत्रे तयार केली. महानगरपालिकेत तक्रार अर्ज करुन बनावट गुंठेवारी प्रतीच्या आधारे त्यांना बांधकाम पाडण्याची भिती दाखविली. मोरे यांच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. समुद्र कुटुंबीयांनी २ लाख ५० हजार रोख स्वरुपात घेतले तसेच ऑनलाइन पद्धतीने ५० हजार रुपये घेतले, असे मोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
सुधीर आल्हाट कोण ?
आल्हाट शिवाजीनगरमधील नरवीर तानाजीवाडी परिसरात राहायला आहे. आल्हाट भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता. माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून तो वावरत होता. आल्हाटने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे खोटे तक्रार अर्ज करून एका पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले होते. तक्रार मागे घेण्यासाठी आल्हाट आणि साथीदारांनी ५० लाख रुपयांची खंडणी पोलीस उपनिरीक्षकाकडे मागितली होती. आल्हाट याच्यासह सात साथीदारांविरोधात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गेल्या महिन्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.