लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : शहरात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस दलात अत्याधुनिक यंत्रसामुग्री असलेली पाच वाहने (सर्व्हेलन्स व्हेईकल) घेण्यात येणार आहेत. या वाहनांमध्ये थर्मल इमेजिंग कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, इन्फ्रारेड सेन्सर यांसह विविध अत्याधुनिक यंत्रणा असणार आहे. या वाहनांचा वापर संवेदनशील भागात गस्त घालणे आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्तासाठीही केला जाणार आहे. बंगळुरू पोलीस दलानंतर पुण्यात अशा प्रकारची वाहने उपलब्ध होणार आहेत.

राज्य शासनाने पुणे पोलीस दलासाठी पाच वाहनांना मंजुरी दिली आहे. या महिन्यात एक वाहन दाखल होणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित चार वाहने पोलीस दलाला मिळणार आहेत. एका वाहनाची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे.

या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, थर्मल इमेज सुविधा असलेले कॅमेरे, तसेच जीपीएस यंत्रणा असणार आहे. तसेच घटनास्थळाचे चित्रीकरण करून तातडीने तपासासाठी उपयुक्त माहिती या वाहनांमधील असलेल्या कॅमेऱ्यांद्वारे उपलब्ध होणार आहे. शहरातील संवेदनशील भागात अशा प्रकारची वाहने तैनात केली जाणार आहेत. या वाहनांमधील कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संशयित, तसेच संवेदनशील ठिकाणांवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. संशयित वाहनांवरील क्रमांक टिपला गेल्यास त्वरित संबंधित वाहन कोणाच्या मालकीचे आहे, याची माहिती उपलब्ध होणार आहे.

या वाहनात ड्रोन कॅमेरे आहेत. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे संवेदनशील भागावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. सभा, मोर्चा, आंदोलनाच्या ठिकाणी हे वाहन तैनात केले जाणार आहे. या वाहनातील कॅमेरे त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला जोडण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलनांच्या ठिकाणच्या परिस्थितीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त कार्यालयातून लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

‘सर्व्हेलन्स व्हेईकल’ची वैशिष्ट्ये

  • गर्दीच्या ठिकाणांसह संवेदनशील ठिकाणांवर कॅमेऱ्यांद्वारे नजर
  • सभा, आंदोलनाच्या ठिकाणी बंदोबस्तास तैनात
  • वाहनांमधील अत्याधुनिक कॅमेऱ्यांद्वारे संशयितांची माहिती उपलब्ध
  • गंभीर गुन्हे घडणाऱ्या ठिकाणांवर वाहनांच्या माध्यमातून लक्ष
  • घटनास्थळांवरील पुरावे संकलित करण्यासाठी मदत
  • बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईसाठी उपयुक्त

अंधारात संशयिताचा शोध

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी उसाच्या फडात लपून बसला होता. त्याचा शोध घेण्यासाठी ५०० पेक्षा जास्त पाेलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी ग्रामस्थांची मदत घेतली होती. पुणे पोलीस दलात दाखल होणाऱ्या या वाहनांमधील कॅमेरे अंधारातही काम करतील. दाट झाडीत लपलेल्या आरोपींना या वाहनातील कॅमेरे टिपतील.

एखादी अनुचित घटना घडल्यास घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देता येतील. संवेदनशील भागात एखादा संशयित आढळून आल्यास त्याची माहिती फेस रेक्गनिजेशन कॅमेऱ्यांद्वारे उपलब्ध होईल. -अमितेश कुमार, पोलीस आयुक्त