पुणे : पुणे पोलिसांनी गेल्या वर्षी शहरातील वेगवेगळ्या भागातून गेल्या वर्षी सात कोटी ७६ लाख रुपयांचे ७८८ किलो अमली पदार्थ जप्त केले होते. पोलिसांनी जप्त केलेले अमली पदार्थ रांजणगाव येथील खासगी कंपनीच्या भट्टीत नष्ट केले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
गुन्हे शाखेचा अमली पदार्थ विरोधी पथक, तसेच विविध पोलीस ठाण्यातील तपास पथकांनी कारवाई करुन तस्करांकडून मेफेड्रोन, ब्राऊनशुगर, अफू, एलएसडी, गांजा असे ७८८ किलो अमली पदार्थ जप्त केले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७५८ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. न्यायालायाचे आदेशानुसार रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील खासगी कंपनीच्या भट्टीत अमली पदार्थ नष्ट करण्यात येणार आहे. पुणे शहरात परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गांजा विक्रीस पाठविला जातो. मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातून गांजाची तस्करी केली जाते. अनेक महाविद्यालयीन युवक गांजाचे व्यसन करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गांजाची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या विक्रेते, तसेच तस्करांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत.
गांजाखालोखाल मेफेड्रोनचे व्यसन अनेक तरुण करत असल्याचे उघडकीस आले आहे. मेफेड्रोनच्या तुलनेत गांजा स्वस्त आहे. वस्ती भागातील अल्पवयीना गांजाच्या आहारी गेले आहेत. यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. मेफेड्रोनची तस्करी मुंबईतून केली जाते. कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीत अर्थकेम लॅबोरटीजवर पुणे पोलिसांनी छापा टाकून तीन हजार ६७४ कोटींचे मेफेड्रोन जप्त केले होते. ही कारवाई पोलिसांनी केली असल्याने मेफेड्रोन नष्ट करण्याची प्रक्रिया पुण्यात करण्यात यावी, असे पत्र पुणे पोलिसांनी ‘एनसीबी’ला नुकतेच दिले. एप्रिल महिन्यात मेफेड्रोन नष्ट करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
कुरकुंभ मेफेड्रोन तस्करी प्रकरणाचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून (एनसीबी) तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात दिल्लीतून अटक करण्यात आलेला आरोपी संदीप यादव याने कुरिअरद्वारे ४०० कोटी रुपयांचे २१८ किलो मेफेड्रोन लंडनला पाठविले होते. यादव याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
या प्रकरणात गुंड वैभव उर्फ पिंट्या माने, हैदर शेख, अजय करोसिया, भीमाजी साबळे, युवराज भुजबळ, आयूूब मकानदार, संदीपकुमार बसोया, दिवेश भुटानी, संदीप यादव, देेवेंद्र यादव, सुनीलचंद्र बम्रन, मोहम्मद कुरेशी, शोएब शेख, सिनथिया उगबाब, अंकिता दास, निशांत मोदी यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मेफेड्रोन तस्करी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया असल्याचे उघडकीस आल्यानंतर तो परदेशात पसार झाला होता. धुनिया हा व्हिएतनामध्ये वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे.