पुणे : ‘दुचाकी वाहनचालकाबरोबरच सहप्रवाशावरील हेल्मेट सक्तीची कारवाई शहरासाठी नसून, महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याबरोबरदेखील चर्चा करण्यात आली असून, त्यांनीही शहरात कारवाई करण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे,’ अशी माहिती कसबा पेठ मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने यांनी दिली.
मोटार वाहन कायद्यानुसार शहरासह जिल्ह्यात दुचाकी वाहनचालकासोबत सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती बंधनकारक आहे. परंतु, वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होत नसल्याने, तसेच अपघातांमध्ये होणारे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने हेल्मेट सक्तीची कारवाई कठोर करावी, असे आदेश वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
हेही वाचा : पुणे: शहरात तूर्त हेल्मेट सक्तीच्या कारवाईचा बडगा नाही, जानेवारी
या निर्णयामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणे पोलिस आयुक्तांशी संपर्क करून माहिती घेतली असता, पुणे पोलिसांकडून अशा प्रकारचे कोणतेही आदेश काढले नसून, ही कारवाई महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात ही कारवाई केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. महामार्गांवर गाडी चालवताना सर्वांनी त्याचे पालन करावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.