पुणे : वारजे माळवाडी दहशत माजविणाऱ्या चार गुंडांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. गुंडांना वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.अभिजित उर्फ चौक्या तुकाराम येळवंड, ओंकार उर्फ टेड्या उमेश सातपुते, गौरव संजय शेळके, ओंकार उर्फ ढेण्या सुधाकर चौधरी अशी कारवाई करण्यात आलेल्या गुंडाची नावे आहेत.
चौधरी अल्पवयीन असल्यापासून गंभीर गुन्हे करत आहे. त्याच्याविरुद्ध चार गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या दीड महिन्यात त्याने गंभीर स्वरपाचे दोन गुन्हे दाखल झाले. त्याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव वारजे पोलिसांनी तयार केला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रस्ताव मंजूर केला. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार चौधरीची वर्षभरासाठी बुलढाणा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. चाैधरी याच्यासह येळवंड, सातपुते, शेळके यांच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, उपनिरीक्षक संजय नरळे, बालाजी काटे, सागर कुंभार, योगेश वाध, निखिल तांगडे, शरद पोळ, गोविंद कपाटे, अमित शेलार यांनी ही कारवाई केली.