पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाची नुकतीच जामिनावर मुक्तता केली. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. याबाबत राज्याच्या विधी आणि न्याय विभागाने पुणे पोलिसांना परवानगी दिली आहे.

कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांचा मृत्यू झाला. याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. अपघात घडल्यानंतर अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने ३०० शब्दांचा निबंध, वाहतूक पोलिसांबरोबर १५ दिवस काम करणे, तसेच दारू सोडविण्यासाठी उपचार घ्यावेत, अशा अटी आणि शर्तीवर जामीन मंजूर केला. अपघात घडल्यानंतर मुलाला जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला. या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा बाल न्याय मंडळात निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात दाद मागितली. मुलाला बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

हेही वाचा – विजयानंतर जल्लोश करणाऱ्या नागरिकांना धमकावणारा तोतया पोलीस अटकेत

मुलाची आत्या पूजा जैन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेवर निकाल दिला. न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांनी मुलाची मुक्तता करण्याचे आदेश दिले, तसेच मुलाचा ताबा आत्याकडे देण्याचेही आदेश दिले. २५ जून रोजी रात्री मुलाची बालसुधारगृहातून सुटका करण्यात आली. त्याच्या आत्याकडे मुलाला सोपविण्यता आले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची परवानगी मागितली होती. विधी आणि न्याय विभागाने पोलिसांना शनिवारी परवानगी दिली. त्यानुससार पुणे पोलीस या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. दोन ते तीन दिवसांत पुणे पोलिसांकडून याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा – पुणे: कात्रज – कोंढवा रस्त्यावर टेम्पो उलटून २० वारकरी जखमी

दरम्यान, या प्रकरणात मुलाचे वडील विशाल, आजोबा सुरेंद्र अगरवाल, तसेच मुलाला मद्य विक्री करणारे पब मालक, व्यवस्थापकांना अटक करण्यात आली. अगरवाल यांनी मोटारचालकाला गुन्हा अंगावर घेण्यासाठी धमकावल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. मुलाला वाचविण्यासाठी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. मुलाची आई शिवानी अगरवालने स्वत:चे रक्त दिल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी ससूनमधील डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली. शिवानी अगरवालला पोलिसांनी अटक केली.

Story img Loader