पुणे : बिबवेवाडीत पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर वैमनस्यातून सराइतावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. त्यानंतर टोळक्याने बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात बुधवारी मध्यरात्री ७० वाहनांची तोडफोड केली. एकापाठोपाठ दांडक्याने वाहनांच्या काचा फोडणाऱ्या टोळक्याच्या दहशतीमुळे परिसरात घबराट उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी तिघांना पकडले. जेथे वाहने फोडली, त्याच भागात पोलिसांनी त्यांची धिंड काढली.

याप्रकरणी पोलिसांनी अंडी उर्फ निरंजन देवकर, अभिषेक पांढरे, गणराज सुनील ठाकर यांना अटक केली. पसार झालेल्या देवकरला वेल्हा परिसरातून अटक केली. वाहन तोडफोडीची घटना उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना पकडण्याचे आदेश दिले. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे, पोलीस शिपाई पवन भोसले यांनी देवकरला वेल्ह्यातून अटक केली. बिबवेवाडी पाेलिसांच्या पथकाने पांढरे आणि ठाकरला अटक केली. उपनिरीक्षक अशोक येवले आणि पथकाने ही कारवाई केली. महिन्याभरापूर्वी आरोपी देवकर, पांढरे, ठाकरे यांचे एकाशी वाद झाले होते. वादातून त्यांना मारहाण करण्यात आली होती.

मारहाणीचा बदला घेण्यासाठी तिघे जण बुधवारी मध्यरात्री बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात आले. त्यांच्याकडे दांडके आणि शस्त्रे होती. तिघांनी दुर्गा माता मंदिर परिसरातील रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारी, टेम्पो, रिक्षा आणि दुचाकींची तोडफोड केली. वाहनांच्या काचा फोडण्याचे आवाज ऐकून झोपेत असलेले रहिवासी जागे झाले. रहिवाशांनी आरडाओरडा केला. शिवीगाळ करुन आरोपी पसार झाले. या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली.

Story img Loader