पुणे : पुण्यातील बालेवाडी भागात चार वर्षांची मुलगी हरवल्याची घटना घडली होती. मात्र, पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासाच्या आत मुलीला शोधून कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं. यामुळे चतु:शृंगी पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पुण्यातील बालेवाडी भागात राहणार्या आकांक्षा संदीप गालफाडे या घरकाम करतात. आकांक्षा नेहमीप्रमाणे सकाळी साडे सात वाजता घरातील सर्व कामं करून कामावर निघाल्या. त्यावेळी त्यांची चार वर्षांची मुलगी अनन्या झोपलेली होती. मात्र, आकांक्षा ११ वाजता घरी आल्यावर त्यांना अनन्या कुठेच दिसली नाही. आसपासच्या घरांमध्ये चौकशी केली असता, कोणालाही काहीच माहिती नव्हती.
हेही वाचा…पुणे : विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
त्यामुळे आकांक्षा यांच्या मनात अनेक विचार येऊ लागल्यावर त्यांनी बालेवाडी पोलीस चौकी गाठली आणि मुलगी हरवल्याची तक्रार केली. पोलिस उपनिरीक्षक आर.आर. पाटील आणि त्यांच्या टीमने त्वरित आकांक्षा गालफाडे राहत असलेल्या परिसरात अनन्याचा शोध सुरू केला. त्यांना जवळपास एक किलोमीटर अंतरावर अनन्या एका दगडावर बसून रडत असल्याचे आढळले. आकांक्षा यांनी तिला जवळ घेतल्यावर अनन्याने सांगितले की, “मी खेळत खेळत इथे आले आणि घरी कसे जायचे समजले नाही, म्हणून इथे बसले.”
हेही वाचा…पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
या घटनेबाबत पोलिस उपनिरीक्षक आर.आर. पाटील म्हणाल्या की, “समाजात आज विविध घटना घडत आहेत. त्यामुळे आपल्याला सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही चुकीच्या घटना दिसल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे. आज आम्ही चार वर्षांच्या मुलीला शोधण्यात यशस्वी झालो, याचे समाधान आहे. परंतु, पालकांनी आपल्या मुलांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.