राज्यात एकीकडे करोनाला नियंत्रणात करण्यासाठी कठोर निर्बंध लावण्यात आले असताना पुण्यात फार्म हाऊसवर डान्स पार्टीचं आयोजन करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांना पार्टीची माहिती मिळाल्यानंतर त्यांना धाड टाकत कारवाई केली. यावेळी पोलिसांनी एकूण १३ तरुण-तरुणींनी अटक केली.
करोनाचे निर्बंध धुडकावत फार्म हाऊसवर डान्स पार्टी करणाऱ्या तरुण तरुणींवर पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. भोर तालुक्यातील केळावडे गावात डान्स पार्टी सुरु असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी फार्म हाऊसवर छापा टाकून सात तरुण आणि सहा तरुणींना अटक केली. त्यांच्याविरोधात करोना प्रतिंबधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांना दिला आहे.
दरम्यान या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेवर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं जात असून अशा पार्ट्या होतातच कशा ? अशी विचारणा होत आहे.