शुभेच्छापत्रांतून वाहनचालकांना भावनिक आवाहन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्रासपणे वाहतूक नियम धुडकावणारे वाहनचालक शहरातील चौकाचौकात पाहायला मिळतात. किंबहुना नियम मोडण्यासाठी असतात अशा अविर्भावात अनेक जण दुचाकी तसेच चारचाकी वाहने दामटवतात. त्यामुळे पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडण्याचे तसेच गंभीर स्वरुपाच्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना शुभेच्छापत्रांच्या माध्यमातून भावनिक आवाहन करण्यात येणार आहे. राखी पौर्णिमेच्या दिवशी सोमवारी (७ ऑगस्ट) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचालकांना दीड लाख शुभेच्छापत्रांचे वाटप पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रमाण जास्त आहे. नियम मोडल्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात होतात. त्यामुळे राखी पौर्णिमेच्या दिवशी वाहतूक पोलिसांकडून अभिनव उपक्रम राबविण्यात यावा, अशी संकल्पना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी मांडली. त्यानुसार राखी पौर्णिमेच्या दिवशी वाहनचालकांना संदेश देण्यासाठी शुभेच्छापत्र वाटण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन करणारी ही शुभेच्छापत्रे राखी पौर्णिमेच्या दिवशी वाटण्यात येणार आहेत. वाहतूक पोलिसांच्या अठ्ठावीस विभागांकडून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत दीड लाख शुभेच्छापत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. शुभेच्छापत्रांबरोबरच वाहनचालकांना पोलिसांकडून राखी बांधण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी कटिबद्ध रहा, असा संदेश पोलिसांकडून देण्यात येणार आहे. राखी पौर्णिमेला धार्मिक महत्त्व आहे. या सणाला असणारे भावनिक संदर्भ विचारात घेऊन शहरातील सर्व प्रमुख चौक आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर राखी पौर्णिमेच्या दिवशी सोमवारी (७ ऑगस्ट) शुभेच्छापत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांच्या प्रत्येक विभागाकडून अंदाजे पाच हजार शुभेच्छापत्रांचे वाटप करण्यात येणार आहे, असेही मोराळे यांनी सांगितले.

वाहतूक पोलिसांचा संदेश

  • वाहतुकीचे नियम पाळा
  • सिग्नल मोडू नका
  • मोटारचालकांनी सीटबेल्टचा वापर करावा
  • वाहन चालवताना मोबाइलवर संभाषण करू नका
  • भरधाव वाहने चालवू नका
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police raksha bandhan to follow traffic rules