पुणे : रिक्षातून प्रवास करताना गहाळ झालेले तीन तोळ्यांचे मंगळसूत्र समर्थ पोलिसांनी केलेल्या तत्पर तपासामुळे ज्येष्ठ महिलेला परत मिळाले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे रिक्षाचालकाचा शोध घेतला. तीन तोळ्यांचे मंगळसूत्र परत मिळाल्यानंतर ज्येष्ठ महिलेने आनंद व्यक्त करुन पोलिसांचे मनाेमन आभार मानले.

कोंढवा परिसरातील एका सोसायटीत राहणाऱ्या राधा अशोक अंकम (वय ६६) या रिक्षाने प्रवास करत होत्या. कसबा पेठेतील फडके हौद चौकातून त्या रिक्षाने निघाल्या. रास्ता पेठेतील पाॅवर हाऊस चौकात त्या उतरल्या. प्रवासादरम्यान त्यांचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र गहाळ झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्या समर्थ पोलीस ठाण्यात गेल्या आणि मंगळसूत्र गहाळ झाल्याची तक्रार दिली. समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी त्यांना धीर दिला. रिक्षाचालकाचा शोध घेण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानंतर तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे आणि तपास पथकाने रिक्षाचालाकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. फडके हौद चौक ते रास्ता पेठेतील पाॅवर हाऊस चौक दरम्यान असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पाेलिसांनी तपासले.

अंकम ज्या रिक्षातून प्रवास करत होत्या. त्या रिक्षाचा क्रमांक एके ‌ठिकाणी चित्रीकरणात आढळून आला. रिक्षा क्रमांकावरनु चालकाचा शोध घेण्यात आला. तेव्हा रिक्षा भीमा रमेश भोजेय हा चालवित असल्याचे आढळून आले. रिक्षा साफ करताना चालक भोजेय याला मंगळसूत्र सापडले. भोजेय मूळचा गुजरातचा आहे. त्याने हे मंगळसूत्र निगडीतील नातेवाईक भरत साेलंकी यांना दिले होते. सोलंकी हे शनिवारी समर्थ पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी तीन तोळ्यांचे मंगळसूत्र पोलिसांना परत केले. त्यानंतर पोलिसांनी तक्रारदार अंकम यांच्याशी संपर्क साधून मंगळसूत्र परत केले. मंगळसूत्र परत मिळाल्याने अंकम यांनी आनंद व्यक्त केला. पोलिसांच्या तत्परतेचे कौतूक करुन त्यांनी आभार मानले, अशी माहिती समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.