पुणे : शहरात विविध ठिकाणी बेकायदा फटाके विक्रीची दुकाने थाटण्यात आली असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ झाला आहे. याबाबत तक्रारी येऊ लागल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विमानतळ पोलिसांनी चार फटाका विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे आहेत.

फटाका विक्री दुकानांना अग्निशमन दल, महापालिका, तसेच पोलिसांकडून परवानगी दिली जाते. परवानगी देण्यापूर्वी अटी, शर्तींची पूर्तता करणे गरजेचे असते. त्यानंतर फटाका विक्रेत्यांना परवानगी दिली जाते. शहराच्या मध्य भागातील वर्तक बाग, गोळीबार मैदान परिसरात फटाके विक्री दुकाने आहेत. तेथील फटाका विक्रेत्यांना परवाना दिला जातो. दिवाळीची सांगता होईपर्यंत तेथे पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या जातात. तेथे अग्निशमन दलाचे जवान आणि बंबही ठेवण्यात येतात. बेकायदा फटाका विक्री दुकाने सुरू करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा >>> शहरबात : वेगाची ‘नशा’ उतरणार का?

उपनगरातील काही विक्रेत्यांनी बेकायदा फटाका विक्री दुकाने उघडल्याच्या तक्रारी, तसेच माहिती आहे. अशा दुकानदारांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी कारवाई करून गुन्हे दाखल केले. नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅलजवळ सुरू करण्यात आलेल्या फटाका विक्री दुकानचालकाविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लोहगावमधील संतनगर परिसरातील गुरुराज फटाका मार्टच्या मालकाविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. संतनगर परिसरातील महालक्ष्मी फटाका मार्ट, तसेच लोहगावमधील भाजी मंडई परिसरातील एकदंत फटाका स्टाॅलच्या मालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भारतीय नागरिक संहिता सुरक्षा २०२३ चे कलम ३५ (३) अन्वये पोलिसांनी फटाका विक्रेत्यांना नोटीस बजावून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली.

हेही वाचा >>> धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या झळाळीत वाढ? सराफी बाजारपेठेतील चित्र जाणून घ्या…

रहिवासी भागात परवानगीशिवाय फटाका विक्री दुकाने सुरू करणाऱ्या दुकानमालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रहिवासी भागात फटाका विक्री दुकानात आग लागल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते. पोलीस, महापालिका प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या फटाका विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाईची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. बेकायदा फटाका विक्रीची दुकाने आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी. – हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार

पोलीस ठाण्यात जप्त फटाके नको

पोलिसांनी विमाननगर, लोहगाव भागातील बेकायदा फटाका विक्री दुकानांवर कारवाई केली. पोलिसांनी तेथील फटाका विक्री दुकाने काढून टाकण्याचे आदेश दिले. फटाके जप्त करून पोलीस ठाण्यात ठेवणे धोकादायक आहे. त्यामुळे पोलिसांनी फटाके जप्तीपेक्षा थेट दुकानमालकांना समज देऊन फटाक्यांसह दुकानच काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाण्यात जप्त केलेले फटाके ठेवल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते.