भटक्या कुत्र्याला दगड मारल्याने त्याचा डोळा निकामी झाल्याची घटना ओैंध भागात घडली आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विनिता चंद्रकांत बराटे (वय ३७, रा. ओैंध रस्ता) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बराटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका व्यक्तीविरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बराटे राहत असलेल्या गल्लीत सिंबा नावाचा भटका कुत्रा आहे. एका अज्ञात व्यक्तीने सिंबाला दगड भिरकावून मारला. तो दगड कुत्र्याच्या डोळ्याला लागला. त्यामुळे कुत्र्याचा डोळा निकामी झाला, असे बराटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक टेमगिरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हडपसर भागात चार दिवसांपूर्वी एका मुलीला कुत्रा चावल्याने एका महिलेने सोसायटीत फिरणाऱ्या दोन कुत्र्याच्या पिलांना काठीने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत दोन पिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडली असताना पोलिसांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करत संबंधित अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.