पुणे : रात्री अपरात्री फटाक्यासारख्या आवाज काढणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी कारवाई केली. बुलेट बसविण्यात आलेले सायलेन्सर पाेलिसांनी जप्त केले. डांबरीकरणासाठी वापरल्या जाणारा रोड रोलर सायलेन्सरवर चालवून नष्ट करण्यात आले. पोलिसांनी या कारवाईत २० सायलेन्सर नष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून शहर, परिसरात भरधाव वेगाने बुलेट चालवून सायलेन्सरमधून फटाक्यासारखे आवाज काढण्यात येत असल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. फटाक्यासारखा आवाज सायलेन्सरमधून निघत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना विशेषत : ज्येष्ठांना होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. आठवड्यापूर्वी लोणी काळभोर भागात पोलिसांनी बुटेलचालकांविरुद्ध कारवाई करुन फटाक्यासारखे आवाज काढणारे सायलेन्सर जप्त केले होते. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी कोंढवा परिसरातील नागरिकांनी केली होती.
त्यानंतर कोंढवा पोलिसांनी २० बुलेटचालकांविरुद्ध कारवाई केली. कर्णकर्कश सायलेन्सर वापरल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी बुलेटचे सायलेन्सर काढून जप्त केले. सायलेन्सरवर महापालिकेचा रोडरोलर चालवून नष्ट करण्यात आले. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक रऊफ शेख आणि पथकाने ही कारवाई केली.
सायलेन्सरमधे फेरफार केल्यानंतर त्यातून फटाक्यासारखा आवाज येतो. काही गॅरेजचालक सायलेन्सरमध्ये फेरफार करून देतात. परप्रांतातून शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, गॅरेजचालक अशा सायलेन्सरला ‘इंदोरी फटका’ असे म्हणतात. यापूर्वी वाहतूक शाखेने शहरातील वेगवेगळ्या भागात कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध कारवाई केली होती. अशा प्रकारचे सायलेन्सर विक्री करणारे दुकानदार आणि गॅरेजचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती.
बुलेट गाड्यांना कर्णकर्कश आवाज असणारे सायलेन्सर बसविण्यात येतात. अशा प्रकारच्या सायलेन्सरवर बंदी घालण्यात आली आहे. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध यापुढील काळात तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहेे.