पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रग निर्मीतीचा कारखाना आणि घाऊक विक्रीची साखळी उध्वस्त केली आहे. आता अमली पदार्थ विक्रीच्या किरकोळ (रिटेल) साखळीतील ५० विक्रेत्यांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी दिली. यासाठी गुन्हे शाखेची पथके तयार केली असून किरकोळ विक्रीचे हे जाळेही लवकरच मोडून काढले जाईल, असे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सागरी सुरक्षेच्या कामासाठीही ९५ पदांची कंत्राटी भरती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाचा शासन आदेश

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली येथे छापे टाकून ३६०० कोटींचे मेफेड्रोन जप्त करत आंतराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त केले. यातील मुख्य सुत्रधार संदीप धुणे परदेशात फरार झाला आहे. त्यासाठी लूक आऊट आणि रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे. त्याचा शोध केंद्रीय तपास यंत्रणा करत आहेत. अमली पदार्थ प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून इतर सहा आरोपींचा शोध पुणे पोलीस घेत आहेत. या माध्यमातून पुणे पोलिसांनी निर्मिती, वाहतूक आणि  घाऊक विक्रीची साखळी उघडकीस आणून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे.

हेही वाचा >>> एमपीएससीत कंत्राटी भरती नको…; भाजपच्या कोणत्या आमदाराने केली मागणी?

पुणे पोलिसांनी आता किरकोळ विक्रेते तसेच पेडलरची साखळी शोधणे सुरु केले आहे. आजवर या साखळीतील ५० जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यातील काही अंमली पदार्थ विक्रीचे सराईत गुन्हेगार आहेत. या सर्वांच्या शोधासाठी गुन्हे शाखेची पथके निर्माण केली आहेत. या प्रकारे पोलीस ग्राहकांपर्यंत अमली पदार्थ पोहोचवणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचणार आहेत. यासाठी राज्यातील मेट्रो सिटीमध्ये मोठी मोहीम राबविण्यात येणार आहे. यातून विक्रेत्यांची साखळी उध्वस्त करण्यात येणार आहे.  अमली पदार्थ विक्रेत्यांबरोबरच शहरात गांजाची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवरही कारवाई करण्यात येणार आहे. यातील ५०० ते ६०० जणांची नावे समोर आली असून त्यांच्यावर सुद्धा कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police search 50 retail drug dealers after bust major drug racket pune print news vvk 10 zws