पुणे : पुणे पोलिसांनी दिल्लीतून ९७० किलो मेफेड्रोन जप्त केले आहे. मेफेड्रोन तस्करीत परदेशातील बडे तस्कर सामील असून, सातजणांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. मेफेड्रोन विक्री आणि तस्करीचे जाळे देशभरात पसरले असून, पुण्यात तयार करण्यात आलेले मेफेड्रोन नेपाळमार्गे परदेशात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात दिली. पुणे पोलिसांनी दिल्लीत कारवाई करून नुकतेच ९७० किलो मेफेड्रोन जप्त केले. याप्रकरणी दिल्लीतून आरोपी संदीप राजपाल कुमार (वय ३९), दिव्येश चरणजीत भुतानी (वय ३८), संदीप हनुमानसिंग यादव (वय ३२) आणि देवेंद्र रामफुल यादव (वय ३२, सर्व रा. नवी दिल्ली) यांना अटक केली. चौघांना शुक्रवारी पुण्यात आणण्यात आले. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी २ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यासह कुरकुंभ, सांगलीतील कुपवाड, तसेच दिल्ली येथून एकूण १८३७ किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. जप्त केलेल्या एमडीची आंतरराष्ट्रीय बाजारात तीन हजार ५७९ कोटी रुपये किंमत आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. आरोपींनी अन्य शहरांत एमडीचा साठा लपवून ठेवला असल्याची शक्यता तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे आणि सहायक सरकारी वकील ॲड. नीलिमा यादव-इथापे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा…अपंग, वृद्धांना आता घरातून मतदानाची संधी; यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभर सुविधा
मेफेड्रोन तस्करीत सॅम, ब्राऊन नावाचे परदेशातील तस्कर सामील आहेत. या प्रकरणात सातजणांचा शोध सुरू आहे. मेफेड्रोनची विक्री कोणाला केली, तसेच वाहतूक कशी केली, यादृष्टीने तपास करायचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती त्यांनी केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी सरकार पक्षाच्या युक्तीवादास विरोध केला. आरोपी तीन दिवस दिल्ली पोलिसांच्या कोठडी होते. आरोपींचे घर आणि कार्यालयातून अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आरोपींना पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तीवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून आरोपींना ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
देशविरोधी गुन्हा; न्यायालयाचे निरीक्षण
पुण्यातील गुंडांकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत मेफेड्रोन तयार करण्यात आले. पुण्यात तयार करण्यात आलेले मेफेड्रोन दिल्लीत विक्रीस पाठविण्यात आले. आरोपींनी केलेला गुन्हा देशविरोधी आहे. अमली पदार्थ विक्रीचे जाळे देशभरात पोहोचले आहे. अमली पदार्थ तस्करांनी महाविद्यालयीन तरुणांना लक्ष्य केले असून, अमली पदार्थांमुळे तरुणाई उद्ध्वस्त होईल, असे निरीक्षण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी व्यक्त केले.
हेही वाचा…लोकसेवा आयोगातच बाह्य यंत्रणेद्वारे भरती; एक वर्षांसाठी काल्पनिक पदनिर्मितीस मंजुरी
अमली पदार्थ पाहणीसाठी न्यायाधीश पोलीस मुख्यालयात
दिल्लीतून चौघांना अटक करण्यात आल्यानंतर आरोपींकडून जप्त करण्यात आलेले ९७० किलो मेफेड्रोनची पाहणी करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आले. पोलीस मुख्यालयात सुनावणी पार पडली.