पुणे : मागील तीन दिवसांत पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्लीत छापा टाकून तब्बल ३ हजार ५०० कोटी रुपये किंमतीचे १७०० किलो ड्रग्स जप्त केले आहे. तर या प्रकरणी एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा – अजितदादांचा सख्खा पुतण्या शरद पवारांसोबत, रोहित पवार म्हणाले…
यावेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, पुणे शहर आणि ग्रामीण भागात आत्तापर्यंत ७१७ किलो आणि दिल्लीत ९७० किलो असे एकूण १७०० ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. तर सर्व कारवायांमध्ये एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच आता दिल्लीनंतर सांगली जिल्ह्यात शोध मोहीम सुरू आहे. पुण्याच्या बाहेर गुन्हे शाखेची १५ पथकं रवाना झाली आहेत. काही अमली पदार्थ कुरिअरमार्फत लंडनलादेखील गेले आहेत. त्यानुसार तपासदेखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.