अहमदनगरमधील एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह भीमा नदीत आढळल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी करणी आणि काळ्या जादुत्या संशयातून हत्या केल्याचा आरोप केला. याबाबत प्रश्न विचारला असता आता स्वतः पुणे पोलिसांनी यावर भूमिका स्पष्ट केली. तसेच या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक केल्याची माहिती पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी बुधवारी (२५ जानेवारी) पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले, “या प्रकरणात आतापर्यंत काळ्या जादुचा कोणताही भाग समोर आलेला नाही. पुढील तपासात हे समोर येईल की नाही याबाबत आम्ही सांगू शकत नाही. प्रथमदर्शनी तरी धनंजय पवार यांच्या मृत्यूबद्दल संशय असल्यावरून खून झाल्याचं समोर आलं आहे.”
हत्या प्रकरणात पाच जणांना अटक
हत्याकांडाची माहिती देताना पुणे पोलिसांनी सांगितलं, “यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत पारगावात भीमा नदीच्या पात्रात १८ ते २२ जानेवारी या काळात एकूण ७ मृतदेह सापडले. ते सर्व एकाच कुटुंबातील होते. त्यात चार जण प्रौढ होते, तर तीन लहान मुलं होती. हा गंभीर प्रकार लक्षात घेऊन आम्ही वेगवेगळी पथकं तयार केली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी मृतकांचे नातेवाईक आहेत आणि त्याच गावात राहतात.”
“आरोपी आणि पीडित एकाच गावचे रहिवासी”
“अशोक कल्याण पवार, श्याम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकाश कल्याण पवार आणि कांताबाई सर्जेराव जाधव (रा. ढवळेमळा, निघोज, तालुका – पारनेर, अहमदनगर) अशी आरोपींची नावं आहेत. मृतकांचं कुटुंबही सध्या तिथेच राहत होतं. हे चुलत भाऊ आहेत,” अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा : करणी-काळ्या जादूच्या संशयातून ३ चिमुरड्यांसह ७ जणांची हत्येचा आरोप, भीमा नदीवर नेमकं काय घडलं? वाचा…
“आरोपींमध्ये चार भाऊ आणि एका बहिणीचा समावेश”
“आरोपीपैकी मोठा भाऊ अशोक पवार यांचा मुलगा धनंजय पवारचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. त्या मृत्यूला मोहन पवारांचा मुलगा अमोल पवार जबाबदार असल्याचा यांना संशय होता. त्या रागातूनच त्यांनी या हत्या केल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर आलं आहे. पाचही आरोपी सख्खे भाऊ-बहिण आहेत. यात चार भाऊ आणि एका बहिणीचा समावेश आहे. यात आणखीही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता आहे. याबाबत आम्ही आणखी तपास करत आहोत,” असंही पोलिसांनी नमूद केलं.