कर्वे रस्त्यावर एका महाविद्यालयाच्या आवारात कोयता उगारुन दहशत माजविणाऱ्या गुंडांची पोलिसांनी महाविद्यालयाच्या परिसरात धिंड काढली. दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीला धडा शिकवल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुणाल कानगुडे आणि ओंकार ननावरे उर्फ डॅनी यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला हाेता. कानगुडेने ननावरेवर कोयता उगारून कर्वे रस्त्यावरील एका महाविद्यालयात दहशत माजविली होती. दहशत माजविण्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. डॅनी ननावरे आणि साथीदार गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शिवाजीनगर आणि डेक्कन पोलीस ठाण्यातील तपास पथकाला ही माहिती मिळाली होती. नदीपात्रात पोलिसांनी सापळा लावून आरोपी ननावरे आणि साथीदारांना पकडले.

हेही वाचा >>> सेवा विकास बँके गैरव्यवहार प्रकरणात माजी संचालक अमर मुलचंदानी यांना ईडीकडून अटक

ओंकार उर्फ डॅनी बाळू ननावरे (वय २१) , गौतम उर्फ लखन अंबादास बनसोडे (वय २९, दोघे रा. राजेंद्रनगर), शाम विलास लोखंडे (वय २०), राम विलास लोखंडे (वय २३, दोघे रा. नवी पेठ), सुनील बाबासाहेब कांबळे (वय २०), रोहन चांदा कांबळे (वय १९), रोहन किरण गायकवाड (वय १९, तिघे रा. शिवाजीनगर), किरण सीताप्पा खेत्री (वय २०, रा. कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून कोयता, स्टीलचा गज, चाकू असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त संदीपसिंह पाटील, सहायक आयुक्त वसंत कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस, पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, सहायक निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, उपनिरीक्षक मीरा कवटीकवार आदींनी ही कारवाई केली.

पोलीस आयुक्तांकडून कौतुक

सदाशिव पेठेत भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर पुणे पोलीस आक्रमक झाले आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहे. डेक्कन आणि शिवाजीनगर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे डेक्कन भागातील नदीपात्रात सराइतांची टोळी पकडली गेली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले असून पोलीस आयुक्तालयात बुधवारी सायंकाळी कारवाई करणाऱ्या पोलिसांचा सत्कार करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police take strong action against koyta gang pune print news rbk 25 zws