पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत असून, पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून अपघाताचा घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याबरोबरच पोलिसांकडून तांत्रिक पुरावे (डिजिटल इव्हीडन्स) गोळा करण्यात येणार आहेत.

या प्रकरणातील पुरावे संकलित करण्यासाठी संपूर्ण घटना ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे उभी केली जाणार आहे. अपघात नेमका कसा झाला, याची माहिती संकलित केली जाणार आहे. तांत्रिक पुरावे संकलित करून आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केलेे जाणार आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांसह, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. मोटारचालक गंगाधर हेरीक्रुब याच्यासह अल्पवयीन मुलाच्या दोन मित्रांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्या घरी जाऊन पोलिसांनी जबाब नोंदविला आहे. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांशी पोलिसांनी संपर्क साधला होता.

हेही वाचा : धक्कादायक : संगणक अभियंता मुलाकडून वृद्ध आईचा खून

या प्रकरणात पुरावे संकलित करताना काही त्रुटी राहिल्यास त्याचा फायदा आरोपींना होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. आरोपींविरुद्ध तांत्रिक पुरावे गोळा करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

पादचारी पट्ट्यावर मोटार उभी केल्याच्या तक्रारी

बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालकडून महागडी मोटार जप्त केली आहे. अगरवालच्या मोटारीवर २३ जानेवारी २०२४ रोजी मुंबईत पादचारी पट्ट्यावर (झेब्रा क्राॅसिंग) मोटार थांबविल्याप्रकरणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर पुण्यात १९ फेब्रुवारी २०२४ रोजी अगरवालची मोटार पादचारी पट्ट्यावर उभी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी अगरवाल याला ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हेही वाचा : Porsche Accident:”पोर्श प्रकरणात आमदाराच्या मुलाचा समावेश, पब पार्टीनंतर रेस..”, नाना पटोलेंचा आरोप

डाॅ. तावरेशी १६ वेळा संपर्क

कल्याणीनगर अपघात प्रकरणात मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससूनमधील डाॅ. अजय तावरे याच्याशी विशाल अगरवालने १६ वेळा संपर्क साधला होता. समाजमाध्यमातील संपर्क सुविधेचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी सीडीआर (काॅल डिटेल रेकाॅर्ड) तंत्राचा वापर केला. तेव्हा डाॅ. तावरे आणि अगरवाल एकमेकांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले.