लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने हडपसर परिसरातून तब्बल तीन कोटी ४२ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. प्रशांत धनपाल गांधी नामक एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखा वाहतूक शाखा आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली.
पुणे सोलापूर महामार्गावरून गुन्हे शाखेच्या पथकाने एक संशयित चार चाकी गाडी थांबवली. त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता वाहनात असलेल्या काही बॅगेत तब्बल तीन कोटी ४२ लाख ६६० हजार रुपये मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी ही रोख रक्कम आणि गाडी हडपसर पोलीस ठाण्यात आणली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा… “…तर नरेंद्र मोदी तुरुंगात जाऊ शकतात”, प्रकाश आंबेडकर यांचं विधान
दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला गांधी यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ही रक्कम राहत्या घरातून लक्ष्मी रस्त्यावरील एका बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. ही रोख रक्कम कर्जापोटी भरायची आहे असे त्यांनी सांगितले. पोलीस तपास करत आहेत.