राजकीय पक्षांच्या राजकारणाचा मतदारांनाच उबग आला की, नेत्यांचे एक वाक्य ठरलेले असते, ‘आम्ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करतो.’ म्हणजे सर्व काही समाजासाठी करत असल्याचे ते दाखवून देतात. मतदारांना रुचणार नाही, असा निर्णय घेतला की, ‘राजकारण आणि प्रेमात सर्व काही माफ असते’ असले वाक्य फेकले की, मतदार काही बोलत नाहीत. सद्या:स्थितीतील राजकीय पक्षांच्या या सोयीच्या राजकारणात आदर्श समाजसेवक, राजकारणी कसे असतात, याचा वास्तुपाठ पुण्यात पूर्वसुरींनी घालून दिला आहे. विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करताना राजकीय पक्षांनी आणि निवडून येणाऱ्या उमेदवारांनी आपल्या पूर्वसुरींनी दाखवून दिलेल्या मार्गांची आठवण ठेवली, तरी पुरेशी आहे.
पुण्याच्या राजकारणाला एक गौरवशाली परंपरा आहे. त्याचे स्मरण राजकीय पक्ष आणि नेत्यांनी ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. राजकारणात नैतिकतेची घसरण सुरू असताना पुण्याचे नेतृत्व किती महान व्यक्तींनी केले आहे, याची आठवण राजकारण्यांनी ठेवण्याची आता वेळ आली आहे. त्या पूर्वसुरींचे स्मरण ठेवले, तर राजकारणात चुकीचा पायंडा पाडणाऱ्यांचे पाऊल चुकीचे पडणार नाही.
हेही वाचा – दिवाळी अशी करा साजरी, महापालिकेने का केले हे आवाहन
तत्कालीन पुणे नगरपालिकेचे सभासद म्हणून महात्मा फुले, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले यांनी काम केले आहे. साहित्यसम्राट न. चिं. केळकर, ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे, नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे सभासद होते. १९२० पूर्वी या महान व्यक्तींनी पुणे नगरपालिकेत नेतृत्व केले आहे. १९२० नंतर काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे यांसारख्या थोर नेत्यांनी पुणे नगरपालिकेचे सभासद म्हणून काम पाहिले आहे.
लोकमान्य टिळक हे १८९५ साली पुणे नगरपालिकेमध्ये पदवीधर मतदारसंघातून निवडून आले होते. गोपाळ कृष्ण गोखले हे १९०४ आणि १९०५ मध्ये नगरपालिकेचे अध्यक्ष होते. हरिभाऊ आपटे हे १९१८ मध्ये नगरपालिकेचे अध्यक्ष होते. पुण्याच्या राजकारणावर महात्मा फुले यांची सामाजिक चळवळ, लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रीय जहाल राजकारण आणि १९२० नंतर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनाचा प्रभाव होता. काकासाहेब गाडगीळ हे १९२८ ते १९३२ या काळात पुणे नगरपालिकेचे सभासद होते. १९३८ मध्ये काँग्रेस पक्षाने पुणे नगरपालिकेची निवडणूक लढविली, तेव्हा आचार्य अत्रे यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे नगरपालिकेची निवडणूक लढविली होती. ते तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्षही होते.
हेही वाचा – रस्ते सफाई वाहनांवर आता ‘ऑनलाइन’ लक्ष
गोपाळ कृष्ण गोखले हे नगरपालिकेचे अध्यक्ष असताना १९०५ मध्ये त्यांना एक महिन्यासाठी इंग्लंडला जायचे होते. या काळात त्यांना अध्यक्षपदाचे काम पाहता येणार नव्हते. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. हे उदाहरण सध्याच्या राजकारण्यांसाठी डोळ्यात अंजन घालणारे आहे. राजकारणात नैतिक मूल्यांची जपणूक कशी करण्यात येत होती, याचा हा दाखला म्हणावा लागेल.
स्वातंत्र्यपूर्व काळातील पुण्याच्या राजकारणातील या महान व्यक्तींनी पुण्याच्या राजकारणाला दिशा देण्याचे काम केले. राजकारणात नैतिकता असते. नैतिकतेची पातळी सोडून राजकारण करायचे नसते, याचा त्यांनी वस्तुपाठ घालून दिला होता. सद्याच्या परिस्थितीत राजकीय पक्ष, नेते आणि उमेदवार यांनी राजकारणाचा खेळखंडोबा केला असताना या महान समाजसेवक, राजकारणींचे स्मरण ठेवले, तर निवडणुका या लोकशाहीचा उत्सव असल्याचे मतदारांना वाटेल आणि राजकारणाची पातळी घसरणार नाही.
sujit.tambade@expressindia. com