पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला १२ जूनपर्यंत बालसुधारगृहातच ठेवण्याचा आदेश बाल न्याय मंडळाने बुधवारी दिला. मुलाचे समुपदेशन करण्यात येत असून, सुधारगृहातून सुटका झाल्यास त्याच्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर बाल न्याय मंडळाने याबाबतचा आदेश दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाल न्याय मंडळाने या प्रकरणात मुलाला बुधवारपर्यंत (५ जून) बालसुधारगृहात पाठविण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्याला आणखी १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी केला होता. या अर्जावर मंडळातील न्यायदंडाधिकारी जे. एम. चौहान यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर त्याला १२ जूनपर्यंत बालसुधारगृहातच ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

हेही वाचा…सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेश यंदा आव्हानात्मक… झाले काय?

कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी अपघात झाला. त्याच दिवशी अल्पवयीन मुलाला जामीन देण्यात आला होता. त्यानंतर मुलाला वाचविण्यासाठी कट रचण्यात आला. याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुलाची मुक्तता केल्यास तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो, तसेच पुराव्यात छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करून मुलाला १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले. मुलाच्या वतीने ॲड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.

मुलाला सज्ञान ठरविण्यासाठी चाचणी

मुलाला सज्ञान ठरविण्यासाठी काही चाचण्या करण्यात येणार आहेत. याबाबतची पूर्तता करण्यासाठी पोलिसांना आणखी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे मुलाला आणखी १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, अशी विनंती सहायक आयुक्त तांबे यांनी न्यायालयाकडे केली.

हेही वाचा…आढळरावांना ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांनीच रोखले?

मुलाचे समुपदेशन करण्याची गरज

मंडळातील समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञांकडून मुलाचे समुपदेशन करण्यात येत आहे. समुपदेशन सत्र अद्याप पूर्ण झाले नाही. त्याला व्यसनाधीनतेपासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे सरकारी वकील मोनाली काळे यांनी न्यायालयात सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune porsche accident case juvenile justice board orders extends observation home remand of accused minor pune print news rbk 25 psg