Pune Porsche Crash Latest Updates: पुण्यात १९ मेच्या पहाटे मद्यधुंद अवस्थेत पोर्श ही कार चालवत एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बाईकवरुन घरी जाणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना उडवलं. या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र १५ तासांत त्याला जामीन मिळाला. १५ तासांत त्याला जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडिया आणि समाजात संताप व्यक्त झाला. १९ तारखेपासून या घटनेवर विविध पडसाद उमटत आहेत. समाजात हा विषय चर्चिला जातो आहे. अशात या मुलाच्या वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली आहे. तर मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या अपघाताचे दोन प्रत्यक्षदर्शी आहेत ज्यांनी या अपघाताच थरार सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्यक्षदर्शी आमिन शेख यांनी काय सांगितलं?

“मी त्या ठिकाणी थांबलो होतो. उजवीकडे कुठलीही गाडी नव्हती. समोरुन गर्दी झाली होती. दोन रिक्षाचालक होते रस्त्याच्या मधे पोहचणार इतक्या अत्यंत वेगात पोर्श कार माझ्या मागून गेली. रस्ता क्रॉस करतानाच कार माझ्या मागून गेली आणि जोरात धडकेचा आवाज आला. मुलगी (अश्विनी कोस्टा) माझ्यासमोर वर उडाली आणि जोरात खाली आदळली. ती ऑन स्पॉट तिथल्या तिथे गेली. तसंच तिच्यासह मुलगा (अनिश अवधिया) होता तो देखील एका बाजूला पडला होता. आम्ही तिकडे गेलो त्या मुलीच्या आणि मुलाच्या अंगावर कपडा टाकला. ते सगळंच दृश्य विदारक होतं.” टीव्ही ९ ला हे आमिन शेख यांनी सांगितलं.

हे पण वाचा- Pune Porsche Accident:पोर्श धडकेत जागीच मृत्यू झालेल्या अश्विनीच्या वडिलांची सून्न करणारी प्रतिक्रिया, “आमची स्वप्नं..”

पैसे ऑफर करत होता अल्पवयीन मुलगा

आमिन शेख पुढे म्हणाले, यानंतर आम्ही पोर्श कारजवळ गेलो कार पुढे जाऊन थांबली होती. अल्पवयीन चालकाला लोक मारत होते. आम्ही पोलिसांना बोलवलं. दोन मुलं पुढे बसली होती. त्यातला तो मुलगा म्हणत होता आम्हाला मारु नका काय पैसे असतील ते घ्या आणि आम्हाला सोडा. ही ऑफर सगळ्यांना तो कार चालक मुलगा देत होता. जेवढं नुकसान झालंय आम्ही भरुन देतो वगैरे सांगत होता. तितक्यात पोलीस आलेच. त्या मुलाला आणि आणि त्याच्या मित्राला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलं. तो मुलगा खूप दारु प्यायला होता. त्यांना पाहूनच कळत होते. त्या दोघांना लोक मारत होते पण मार लागतही नव्हता. आम्हाला मारु नका आम्ही पैसे देतो असं तो मुलगा तीन-चारवेळा सांगत होता. कारमध्ये तीन मुलं होती. त्यांना जमावाने त्यांना मारलं. ज्यांना मारत होते ते दोघंही तेच सांगत होते की आम्ही हवे तितके पैसे देतो.” असं आमिन शेख यांनी सांगितलं.

प्रत्यक्षदर्शी संकेतने काय सांगितलं?

“पोर्श कारची स्पीड लिमिटच नव्हती. पोर्श इतक्या वेगात आली की त्या वेगात या कारने दोघांना धडक दिली. मुलगी (अश्विनी कोस्टा) १५ फूट वर उडाली आणि खूप वेगाने खाली पडली जागीच तिचा मृत्यू झाला. तो मुलगा (अनिश अवधिया) स्विफ्ट कारच्या जवळ पडला. एका ज्युपिटरवर चाललेल्या माणसालाही त्या कारने उडवलं. पोर्श कारच्या एअरबॅग्ज उघडल्या. आम्ही धावत जाऊन पुढे पाहिलं तर तो अल्पवयीन मुलगा आणि त्याचे मित्र त्या कारमध्ये नव्हते. त्यानंतर कारच्या पुढे तो होता. मी आणि माझे काही मित्र होते आम्ही त्या मुलाला (अल्पवयीन मुलगा) पकडून आणलं. त्यावेळी त्या ठिकाणी जे लोक होते त्यांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्याला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलं.” असं संकेत नावाच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. इंडिया टुडेशी चर्चा करताना त्याने ही घटना सांगितली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune porsche accident we saw the girl in the air and fell down eyewitnesses narrated the thrill scj
Show comments