पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणामुळे आता राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावरून अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे.
अंजली दमानियांनी यांनी एक्स या समाज माध्यामावर पोस्ट करत अजित पवारांना पाच प्रश्न विचारले आहेत :
१) पालकमंत्री म्हणून आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी तुम्ही ठिय्या देऊन सीपी ऑफिसमध्ये का बसला नाहीत?
२) ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांच्या बाजूला का बसले नव्हता?
३) याप्रकरणी प्रतिक्रिया द्यायला तुम्हाला ४ दिवस का लागले?
४) घटना घडली तेव्हा तुम्ही नेमके कुठे होतात?
५) तुमचे आणि आरोपीच्या कुटुंबाचे आर्थिक संबंध होते का?
असे प्रश्न त्यांनी अजित पवारांना विचारले आहेत. पुढे बोलताना, शुल्लक गोष्टींवर भडकणारे अजित पवार, आज पत्रकार परिषदेत गांगरल्यासारखे का होते? जर आरोप खोटे होते तर ते भडकले कसे नाहीत? असे प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केले. याप्रकरणी आणखी बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
तत्पूर्वी सकाळी अंजली दमानिया यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. हा अपघात घडल्यानंतर अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. “याप्रकरणी काही पत्रकारांच्या पोस्ट मी पाहिल्या, वाचल्या. अजित पवारांनी पुण्यातल्या पोलीस आयुक्तांना फोन केल्याचं काही जण म्हणत आहेत. हीच शंका माझ्याही मनात होती. कारण सुरुवातीचे चार दिवस अजित पवार काहीच बोलले नाहीत. मी रोज सकाळी उठून काम करतो वगैरे म्हणणारे अजित पवार अपघाताबाबत गप्प होते. प्रत्येक वेळी सुनील टिंगरेचं नाव पुढे येत होतं. ही सगळी सारवासारव कुणासाठी चालली होती?” असे त्या म्हणाल्या होत्या.
हेही वाचा – पुण्यातील अपघात प्रकरणावरून आव्हाडांची अजित पवारांवर टीका; म्हणाले, “राष्ट्रवादीचं कार्यालय खरेदीसाठी…”
१९ तारखेची घटना नेमकी काय?
१९ मे च्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत एका अल्पवयीन मुलाने पोर्श कार भरधाव वेगात चालवत दोघांना चिरडलं. या घटनेत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू झाला. यानंतर या प्रकरणात संबंधित मुलाला अटक करण्यात आली. मात्र त्याला १५ तासांत जामीन मंजूर करण्यात आला. ज्यामुळे सोशल मीडिया आणि पुणे शहरांत संताप व्यक्त झाला. यानंतर या प्रकरणात मुलाच्या वडिलांना आणि आजोबांनाही अटक झाली आहे. आज या प्रकरणी ससूनच्या डॉक्टरांनी मुलाच्या रक्ताचे नमुने बदलले अशीही बाब समोर आली आहे. तसंच जनक्षोभ वाढल्यानंतर या मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.