पुण्यातील कल्याणीनगर भागात मागील महिन्यात पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते. या प्रकरणातील आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. तसेच या आरोपीच्या वडिलांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. आता या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, हा जामीन एका गुन्ह्यात झाला असल्यामुळे इतर दोन गुन्हे दाखल असल्यामुळे आरोपीच्या वडीलांना कोठडीत राहावं लागणार आहे.
पुणे पोर्श कार अपघात प्रकरण अनेक धक्कादायक माहिती समोर येत गेली होती. हा अपघात घडल्यानंतर पोर्श या गाडीतील ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप झाला होता. तसेच हा अपघात घडला त्यानंतर आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, या सर्व प्रकऱणाचा अद्याप तपास सुर आहे.
हेही वाचा : राज्यात ‘डीएपी’ खताचा तुटवडा, जगभरातून आयात घटली
पोर्श कार अपघात प्रकरणात पोलिसांनी या मुलाच्या आईलाही अटक केलं होतं. तसेच आरोपीच्या आजोबालाही अटक केलं होतं. त्यामुळे या अपघात प्रकरणानंतर एकाच कुटुंबातील चौघजणांना पोलिसांनी अटक केली होती. आता या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना दाखल तीन गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला आहे. मात्र, इतार दोन गुन्हे दाखल असल्यामुळे ते कोठडीत राहणार आहेत. दरम्यान, मुलगा अल्पवयीन आहे, हे माहिती असतानाही त्याला गाडी दिल्या प्रकरणातील दाखल गुन्ह्यात हा जामीन मिळाला आहे.
घटना काय घडली होती?
एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमीच्या वेगाने पोर्श कार चालवत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर अनिशला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. अनिश अवधिया हा २४ वर्षांचा तरुण होता. पुण्यात त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. तसंच मागच्या काही वर्षांपासून आयटी विभागात काम करत होता. तर अश्विनी कोस्टा त्याची मैत्रीण होती. दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. मित्रांसह डिनरला गेले होते. हे दोघे बाईकवरुन निघाले त्यानंतर काही सेकंदातच भरधाव वेगात आलेल्या पोर्शने या दोघांना धडक दिली. ज्यात या दोघांचा मृत्यू झाला होता.