पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी बाल न्याय मंडळाने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठविण्याचे आदेश दिले आहेत. अल्पवयीन मुलाला आणखी काही दिवस बालसुघारगृहात ठेवावे, असा अर्ज पोलिसांकडून दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुणासह त्याच्या मैत्रिणीला धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणात अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याला बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले. बाल न्याय मंडळाने त्याला अपघातावर ३०० शब्दांचा निबंध आणि १५ दिवस वाहतूक पोलिसांबरोबर काम करण्याचे आदेश देऊन मुलाची मुक्तता केली. बाल न्याय मंडळाच्या या निर्णयावर टीका झाली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली. या निर्णयाच्या विरोधात पोलिसांनी दाद मागितली. त्यानंतर बाल न्याय मंडळाने निकालात दुरुस्ती करून अल्पवयीन मुलाला पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले.

हेही वाचा : Pune Accident : पोर्श गाडीत दोष की तांत्रिक बिघाड? तपासणीनंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती!

विशेष समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञांची मदत

गंभीर गुन्ह्यातील मुलांचे बालसुधारगृहात समुपदेशन करण्यात येते. कल्याणीनगर अपघात प्रकरणाचे स्वरुप विचारात घेता मुलाच्या समुपदेशनासाठी विशेष समुपदेशकांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच मुलाला तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञांनी देखील समुपदेशन करावे. याबाबतचा अहवाल मंडळात सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभावाच्या घटना किती? युजीसीने मागवली माहिती…

बालसुधारगृहानंतर पुढे काय ?

मुलाला पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुलाची मुक्तता झाल्यानंतर त्याचा ताबा कोणाकडे द्यायचा, त्यांची नावे द्यावीत, अशी सूचना मंडळाने मुलाच्या वकिलांकडे केली आहे. मुलाचा रक्ताच्या नात्यातील सदस्यांकडे ताबा देता येणार नाही. त्यामुळे त्रयस्थ व्यक्तीची नावे द्यावीत, असे मंडळाने आदेशात म्हटले आहे. मात्र, अद्याप ही नावे मंडळात सादर करण्यात आलेली नाहीत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune porsche car accident child to be kept in de addiction centre juvenile justice board orders pune print news rbk 25 css