पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा रक्तनमुना बदलल्याप्रकरणी पोलिसांनी ससून सर्वोपचार रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली आहे. महाराष्ट्र वैद्यक परिषदेने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत या दोन्ही डॉक्टरांना नोटीस बजावली होती. या नोटिशीला दोन्ही डॉक्टरांनी उत्तर दिले असून, आता परिषदेने पुणे पोलीस आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडून माहिती मागविली आहे. यानंतर या डॉक्टरांवरील कारवाईची प्रक्रिया सुरू होणार आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन कक्षातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांना पोलिसांनी अटक केली होती. सध्या हे दोन्ही डॉक्टर न्यायालयीन कोठडीत आहेत. या दोन्ही डॉक्टरांना वैद्यकीय शिक्षण विभागाने निलंबित केले आहे. याचबरोबर महाराष्ट्र वैद्यक परिषदेने या दोन्ही डॉक्टरांनी मे महिन्याच्या अखेरीस नोटीस बजावली होती. या नोटिशीला सात दिवसांत उत्तर देण्याचा अवधी त्यांना देण्यात आला होता.
डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांची त्यांचे उत्तर परिषदेला पाठविले आहे. त्यांनी हे उत्तर त्यांच्या वकिलांमार्फत पाठविल्याचे समजते. यामुळे परिषदेने आता पुणे पोलिसांकडे या प्रकरणाची माहिती मागितली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने चौकशी समिती नियुक्त केली होती. त्याचा अहवालही परिषदेने मागविला आहे. पोलिसांची माहिती आणि समितीचा अहवाल तपासून परिषद या दोन्ही डॉक्टरांवर कारवाई करणार आहे. मात्र, तोपर्यंत कारवाईसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
निलंबनाच्या काळात मनाई
वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना निलंबित करताना त्यांना निलंबनाच्या कालावधीत इतरत्र काम करण्यास मनाई केली आहे. निलंबनाचे आदेश आहेत तोपर्यंत या दोघांना खासगी नोकरी, व्यापार अथवा उद्योगधंदा करता येणार नाही, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : पावसाळ्यात रस्तेखोदाई केल्यास फौजदारी कारवाई, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा इशारा
ससून रुग्णालयातील प्रकरणाची स्वत:हून दखल घेऊन दोन्ही डॉक्टरांना परिषदेने नोटीस बजावली होती. त्यांनी या नोटिशीला उत्तरही पाठविले आहे. हे डॉक्टर परिषदेला दोषी आढळल्यास त्यांचा वैद्यकीय परवाना एक दिवसापासून ते कायमस्वरूपी कालावधीसाठी रद्द केला जाऊ शकतो.
डॉ. विंकी रुघवानी, प्रशासक, महाराष्ट्र वैद्यक परिषद