पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने आलिशान कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल, आजोबा सुरेंद्र अगरवाल आणि पब चालक, व्यवस्थापक यांना अटक करण्यात आली आहे. तर या अपघाताच्या घटनेमध्ये दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मुलाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे या तीन आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी आणि बचाव पक्षाकडून युक्तीवाद झाला. त्यावेळी तिन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्या मागणीला बचाव पक्षाच्या वकिलांनी विरोध दर्शविला. मात्र त्यावर न्यायालयाने तिघा आरोपींना ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा : Porsche Accident: पोर्श अपघात प्रकरणी फडणवीसांची प्रतिक्रिया, “कुणालाही सोडणार नाही, लवकरच..”
सरकारी पक्षाचे वकिल युक्तिवाद करतेवेळी म्हणाले की, अल्पवयीन आरोपीचे रक्त घेण्यात आले नसून इतर व्यक्तीचे रक्त घेण्यात आले आहे. ज्या व्यक्तीचे रक्त तपासणीसाठी घेण्यात आले. त्यावेळी सिरींज कचर्यामध्ये टाकणे जरुरीचे होते. पण ती सिरींज डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी दुसर्या व्यक्तीला दिली आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. रक्ताच्या नमुन्याचे रिपोर्ट कोणाच्या सांगण्यावरून बदलण्यात आले? वरील सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी या आरोपींची सात दिवसांकरीता पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर ५ जूनपर्यंत तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
© The Indian Express (P) Ltd