Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर येथे शनिवारी (१८ मे) रात्री एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने महागड्या पोर्श कारने एका दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीस्वार आणि दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणीचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं होतं. रविवारी (१९ मे) दुपारी त्याला विशेष हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आलं. सरकारी वकिलांनी या आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, आरोपी अल्पवयीन (साडेसतरा वर्षे) असल्यामुळे न्यायालयाने सरकारी वकिलांची मागणी फेटाळत त्याचा जामीन मंजूर केला होता. तसेच आरोपीला अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगितलं होतं. पाठोपाठ त्या मुलाला वाहन चालवायला देणाऱ्या त्याच्या वडिलांना अटक करण्याचे आदेशही दिले होते. आरोपीच्या वडिलांना पोलिसांनी मंगळवारी छत्रपती सभाजीनगरमधून अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अल्पवयीन आरोपीने अपघातापूर्वी दोन पबमध्ये जाऊन मद्यप्राशन केलं होतं, याबाबतचा दावा करणारे आरोपीचे पबमधील सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तो नशेत कार चालवत असतानाच दुचाकीला धडक दिली असा आरोप केला जात आहे. मात्र पोलिसांनी त्याने मद्यप्राशन केलं नव्हतं असा अहवाल दिला आहे. अशातच विशेष हॉलिडे न्यायालयाने त्याला जामीन दिला. मात्र बाल हक्क न्यायालयाने याप्रकरणी कडक पावलं उचलली आहेत. बाल हक्क न्यायालयात आरोपी अल्पवयीन असल्याचा युक्तीवाद त्याच्या वकिलांनी केला. तर या आरोपीने केलेलं कृत्य भीषण असून त्याच्यामुळे दोन जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे त्याच्यावर खटला चालवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी पोलीस आणि सरकारी वकिलांनी केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. आरोपी सज्ञान आहे की अज्ञान हे पोलीस तपासानंतर ठरवलं जाईल, असंही बाल हक्क न्यायालयाने स्पष्ट केलं.

हे ही वाचा >> Pune Accident : अजित पवार गटाचे आमदार आरोपीच्या अटकेनंतर मध्यरात्री पोलीस ठाण्यात का गेले? ठाकरे गटाचा सवाल

आरोपीच्या वडिलांना कोठडी

दरम्यान, या आरोपीच्या वडिलांना पुणे सत्र न्यायालयाने २४ मेपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वकील असीम सरोदे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. या प्रकरणाची सुनावणी संपल्यानंतर सरोदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सरोदे म्हणाले, “या प्रकरणात मुलाचे वडील आरोपी आहेत. त्यांनी वडिलांची भूमिका व्यवस्थित पार पाडली नाही. कारवर नंबर नसताना, मुलाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसातानाही त्याला कार चालवायला दिली. १८ वर्षे वय झालेलं नसूनही त्याला पबमध्ये पाठवणं चांगल्या पालकांचं लक्षण नाही. बाल न्याय हक्कानुसार आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष केलं आहे, तसेच तुम्ही मुलावर नियंत्रण ठेवलं नाही. त्यामुळे कोर्टाने २४ मे पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.” अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह बारचालक (जिथे आरोपीने मद्यप्राशन केलं होतं) आणि बारच्या व्यवस्थापकांनाही यांनाही तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.