पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू या धडकेत झाला. या दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. ज्याचे पडसाद सोशल मीडियासह राज्यभरात उमटले. त्यानंतर २३ मे रोजी या मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत तो मुलगा एक रॅप साँग म्हणताना आणि शिव्या देताना दिसतो आहे. मात्र या व्हिडीओबाबत आता या मुलाच्या आईने समोर येत स्पष्टीकरण दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात

सोशल मीडियासह पुणे आणि राज्यभरातून पोर्श अपघात प्रकरणावर जेव्हा संतप्त पडसाद उमटले त्यानंतर दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची रवानगी १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणात मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. या मुलाचे वडील पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत.

हे पण वाचा- Pune Porsche Accident: “माझ्या मुलाची हत्या करणाऱ्या त्या मुलाला…”, अनिशच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

रविवारी नेमकी काय घटना घडली?

१७ वर्षे आठ महिने वय असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमीच्या वेगाने पोर्श कार अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर अनिशला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अनिश अवधिया हा २४ वर्षांचा तरुण होता. पुण्यात त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. तसंच मागच्या काही वर्षांपासून आयटी विभागात काम करत होता. तर अश्विनी कोस्टा त्याची चांगली मैत्रीण होती. दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. मित्रांसह डिनरला गेले होते. हे दोघे बाईकवरुन निघाले त्यानंतर काही सेकंदातच भरधाव वेगात आलेल्या पोर्शने या दोघांना धडक दिली. ज्यात या दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर अनिश आणि अश्विनी या दोघांच्याही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशात २३ मे रोजी एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात अल्पवयीन मुलगा अपघाताबाबत रॅप गाणं गातो आहे आणि शिव्या देतो आहे असं दिसलं. ज्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्याच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. त्यानंतर आता या मुलाच्या आईने सदर व्हिडीओ खोटा असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

हे पण वाचा- “पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्तांनी पैसे खाल्ले, त्यामुळेच…”; रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

काय म्हटलं आहे अल्पवयीन मुलाच्या आईने?

“नमस्कार मी शिवानी अग्रवाल. अल्पवयीन आरोपीची मी आई आहे. मी मीडियाला विनंती करते की व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा माझ्या मुलाचा नाही. तो फेक व्हिडिओ आहे हे कृपा करुन लक्षात घ्या. माझा मुलगा बालसुधारगृहात आहे. मी पोलीस आयुक्तांना विनंती करते की कृपा करुन त्याच्या सुरक्षेची काळजी घ्या. प्लीज, प्लीज, प्लीज.” असं त्या म्हणताना दिसत आहेत.

कथित व्हिडिओमध्ये काय दिसतं आहे?

२३ मे रोजी सोशल मीडियावर कथित व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत अल्पवयीन मुलगा अपघात झाल्यानंतर जामिनावर सुटलाय आणि रॅप गाणं म्हणतो आहे. करके बैठा मै नशे इन माय पोर्शे असे त्याचे शब्द आहेत. तसंच तो शिवीगाळही करताना दिसतो आहे. आता या व्हिडीओबाबत मुलाच्या आईने स्पष्टीकरण दिलं आहे आणि व्हिडीओ खोटा आहे असं म्हटलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune porshe accident mother of minor boy cried in front of camera and request about viral video scj