पुणे : गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या समितीने बुधवारी पोलिसांसह वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आपला अहवाल पाठविला. गर्भवतीवर उपचार करताना डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाला का, याची चौकशी समितीने केली आहे. मात्र, हा अहवाल सादर करताना गोपनीयतेचा भंग होऊ नये, यासाठी हा अहवाल मुंबईत वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे थेट कर्मचाऱ्याकरवी पाठविण्यात आला असून, अलंकार पोलीस ठाण्याला टपालाने पाठविण्यात आला आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांसाठी उपचारास नकार दिल्याने ईश्वरी (तनिषा) भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने या प्रकरणी समिती नेमून चौकशीचे आदेश दिले होते. राज्याचा आरोग्य विभाग, महापालिकेची माता मृत्यू अन्वेषण समिती आणि सहधर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती अशी तीन समित्यांकडून या प्रकरणी चौकशी करण्यात आली. या तिन्ही समित्यांनी यापूर्वीच चौकशी अहवाल राज्य सरकारला सादर केले आहेत.

ईश्वरी भिसे यांच्यावरील उपचारात निष्काळजीपणा झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी अलंकार पोलीस ठाण्यात दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने ईश्वरी भिसे यांच्यावरील उपचारात निष्काळजीपणा झाला का, याची तपासणी ससून रुग्णालयाच्या समितीने केली. समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासह सूर्या हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल आणि इंदिरा आयव्हीएफ सेंटर या चारही रुग्णालयांमध्ये उपचार करताना निष्काळजीपणा झाला का, याची चौकशी ससूनच्या समितीने केली.

ससूनच्या प्रशासनाने बुधवारी अहवाल तयार केल्यानंतर सायंकाळी तो वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे कर्मचाऱ्याकरवी थेट मुंबईला पाठविला. ई-मेलवर अहवाल पाठविल्यास तो हॅक होऊन अहवाल फुटण्याची भीती रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली. यामुळे अलंकार पोलीस ठाण्यालाही टपाल विभागाच्या माध्यमातून अहवाल पाठविण्यात आला. ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनीही याला दुजोरा दिला. मात्र, या निमित्ताने रुग्णालय प्रशासनाला अहवालापेक्षा फुटण्याची भीती अधिक असल्याचे समोर आले.

ससूनच्या समितीने चौकशी करून अहवाल अलंकार पोलीस ठाण्यात टपाल विभागाच्या माध्यमातून पाठविला आहे. वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे मुंबईला हा अहवाल घेऊन रुग्णालयाचा कर्मचारी पाठविण्यात आला आहे.- डॉ. यल्लपा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालय