हिंजवडीच्या वाहतूक महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे राजश्री माधव वाघमारे या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. राजश्री या गरोदर असल्याने प्रसूतीसाठी औंध रुग्णालयात जात होत्या. तेव्हा त्यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना तात्काळ वाहतूक पोलीस कर्मचारी नीलम विजय चव्हाण आणि रेशमा नजीर शेख यांनी जवळच्या खोलीत नेलं. तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधला आणि काही वेळातच राजश्री यांनी गोंडस बाळाला जन्म दिला.
हेही वाचा – स्वारगेट, हडपसर भागातील जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेचा छापा, आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलम आणि रेश्मा या दोघी वाहतूक पोलीस कर्मचारी आहेत. दोघी वाकडे येथे कर्तव्य पार पाडत होत्या. तिथून गरोदर असलेल्या राजश्री माधव वाघमारे औंधकडे जात होत्या. परंतु, त्यांच्या पोटात अचानक दुखायला लागल्याने दोन्ही महिला वाहतूक कर्मचारी यांनी प्रसंगावधान दाखवत रुग्णवाहिका आणि डॉक्टरांशी संपर्क करून त्यांना तात्काळ बोलवलं. गरोदर राजश्री यांना धीर दिला. जवळच्याच दुकानाच्या समोर नेलं. तिथं डॉक्टर आले आणि त्यांची सुखरूप प्रसूती करण्यात आली. राजश्री यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी नीलम आणि रेश्मा यांचे कौतुक होत आहे. दोघींनी प्रसंगावधान दाखवत वेळीच डॉक्टर आणि रुग्णवाहिकेला पाचारण केलं. राजश्री यांना अधिकच्या उपचारासाठी औंध रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ही सर्व घटना रविवारी घडलेली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.