Tanisha Bhise death case: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने गर्भवती असेलल्या तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांकडून दहा लाखांची मागणी केली. पैशांअभावी वेळेत उपचार न दिल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू ओढवला, असा आरोप भिसे कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनंतर पुण्यासह राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने भिसे कुटुंबियांचे आरोप फेटाळले असून सदर प्रकाराची रुग्णालयाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले. तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक आहेत. आमदारांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून रुग्णालय प्रशासनाला विनंती करूनही रुग्णालयाने उपचार देण्यास नकार दिला, अशी माहिती समोर येत आहे.
तनिशा भिसे यांच्या कुटुंबियांनी काय सांगितले?
सुशांत भिसे यांच्या भगिनी प्रियांका पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. जुळ्या बाळांची तब्येत आता कशी आहे? याबद्दलही त्यांनी माहिती दिली. ‘एका बाळाचे व्हेटिंलेटर काढले आहे. दोन्ही बाळांची प्रकृती आता स्थिर आहे’, अशी माहिती त्यांनी दिली.
त्यांनी पुढे म्हटले की, त्यादिवशी आम्ही सकाळी ९ वाजता मंगशेकर रुग्णालयात गेलो. तिथे डॉक्टर घैसास यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर बीपी वाढल्याचे सांगितले. तिथून त्यांनी नव्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर वहिनीला शिफ्ट करण्यास सांगितले. तिथे असेसमेंट रुममध्ये दुसरे डॉक्टर आले. त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव करून दिली. सिझर करावे लागेल, त्यामुळे काही खाऊ-पिऊ नका, असे सांगितले. सिझरची तयारीही त्यांनी केली, रुग्णाचे कपडे घालायला दिले. त्यानंतर डॉक्टर घैसास आले, त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले. रक्तस्राव होत असल्यामुळे लगेचच शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले.
प्रियांका पाटील म्हणाल्या, “सातव्या महिन्यात प्रसूती होत असल्यामुळे बाळांना NICU मध्ये ठेवावे लागेल, असे सांगितले. दोन्ही बाळांचा प्रत्येकी दहा लाख असा वीस लाखांचा खर्च होईल, असेही ते म्हणाले. मात्र आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी दहा लाख आता भरण्यास सांगितले. पैसे भरणे शक्य नसल्यास तुम्ही ससूनला जाऊन उपचार घेऊ शकता, असेही म्हटले. हे सर्व आमची वहिणी तनिशा भिसे यांच्यासमोरच सांगितल्यामुळे वहिणीच्या मनावर दबाव आला. आधीच रक्तस्राव, उच्च रक्तदाब असल्यामुळे वहिनीची परिस्थिती नाजूक होती, त्याच खर्चाचा आकडा पाहून ती अशरक्षः कोसळली. वहिनी तिथेच रडायला लागली.”
आम्ही पैशांची व्यवस्था करतो, अशी विनंती वारंवार करत होतो. रुग्णाच्या मनाला समाधान मिळेल यासाठी तरी उपचार सुरू करा, असेही म्हणालो. पण रुग्णालयाने रस्तस्राव थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. आधीच्या रुग्णालयातून मिळालेली गोळीच खा, असे उत्तर दिले.
रुग्णालयाने काय सांगितले?
दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलत असताना सदर प्रकरणाची चौकशी रुग्णालयाकडून केली जाणार असल्याचे सांगितले. “सदर प्रकरणात जी माहिती समोर आली आहे, ती दीशाभूल करणारी आहे. चौकशी यंत्रणांना आम्ही सर्व ती माहिती देणार आहोत”, असे रवी पालेकर म्हणाले.
© IE Online Media Services (P) Ltd